शेतकरी संकटांच्या भोवऱ्यात; अवेळी पावसानंतर आता पिकांवर किडींचा हल्ला 

Fawarni
Fawarni

सिरोंचा (जि. गडचिरोली) : दुष्काळामुळे नुकसानभरपाईची मागणी केली जात असतानाच आता किडींच्या प्रादुर्भाने बहुतांश पिके संकटात सापडली आहेत. यामुळे यंदा उत्पादनात घट होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. 

गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने तालुक्‍यातील धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले. निसर्गाने दिलेला हा झटका सहन करीत असतानाच कापूस, मिरची व अन्य पिकानांही जोरदार फटका बसला आहे. सिरोंचा तालुक्‍यातील अंकिसा, आसरअल्ली, नगरम, रमंजापूर, जानमपल्ली, मद्दीकुंटा, सूर्यापल्ली, आदीमुत्तापूर, मेडाराम, कारसपल्ली, रेगुंठा, झिंगानूर इत्यादी गावांतील शेतकऱ्यांनी धान व कापसाची तसेच मिरची पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. यावर्षीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे धानपीक सुस्थितीत होते. परंतु परतीच्या पावसामुळे हलक्‍या व मध्यम प्रतीच्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे, तर जड धान पूर्णत: बांध्यांमध्ये कोसळला. 

जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांपेक्षा सिरोंचा तालुक्‍यात शेतकरी कापूस, सोयाबीन तसेच मिरची व मका पिकाची लागवड करतात. यासाठी शेतकऱ्यांना बॅंक, पतसंस्था व सावकारांकडून कर्ज काढावे लागते. यंदाही मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी कर्ज काढून विविध पिकांची लागवड केली होती. परंतु पीक अंतिम टप्प्यात असताना निसर्गाने साथ दिली नाही. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस जोरदार बरसला. याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवरही झाला आहे. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने योग्यप्रकारे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. तसेच कापूस पिकावरील रोग नियंत्रणासाठी योग्य सल्ला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

मुलचेरा तालुक्‍याला दुष्काळाची झळ 
मुलचेरा तालुक्‍यात 558.12 हेक्‍टर शेतीतील पिकांचे परतीच्या पावसाने नुकसान झाल्याचे प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. या तालुक्‍यातील गोमणी, कोपरअल्ली, मुलचेरा, सुंदरनगर, लगामचेरू, लगाम या गावांतील शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा असून आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी यासंदर्भातले निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com