शेतकऱ्याच्या मुलीची पंतप्रधान मोदींविरुद्ध पोलिसांत तक्रार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

यवतमाळ : घाटंजी तालुक्‍यातील राजूरवाडी (करणवाडी) येथील शेतकरी शंकर चायरे यांनी मंगळवारी (ता. दहा) विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येस मोदी सरकार जबाबदार असल्याचा मजकूर त्यांनी चिठ्ठीत लिहिला. त्यामुळे पंतप्रधान मोदींविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी तक्रार घाटंजी पोलिस ठाण्यात देण्यात आली. दरम्यान, बुधवारी (ता. 11) मृत चायरे यांच्या नातेवाइकांची समजूत काढण्यात यश न आल्याने शवविच्छेदन करण्यात आले नव्हते.

कर्ज व नापिकीला कंटाळलेल्या चायरे यांनी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली. शेतात त्यांनी लिहिलेली चिठ्ठी नातेवाइकांच्या हाती लागली. कापूस झाला नाही. बोंडअळीमुळे कर्जबाजारी झाले. मृत्यूस मोदी सरकार जबाबदार राहील, असा उल्लेख चिठ्ठीत आहे. यंदा काहीच उत्पन्न न झाल्याने वडील विवंचनेत राहायचे. त्यांच्या आत्महत्येस सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप मृत शेतकऱ्याची मुलगा जयश्री (वय 21) हिने घाटंजी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा व आपल्या कुटुंबास न्याय द्यावा, अशी मागणी जयश्रीने तक्रारीत केली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री आल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका मृत शंकर चायरे याचे नातेवाईक व ग्रामस्थांनी घेऊन मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. मृताच्या कुटुंबाला एक कोटी रुपये देण्यात यावे व त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन आश्‍वासन द्यावे, त्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. पोलिसांनी मध्यस्थीद्वारे समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. त्यामुळे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहातच ठेवण्यात आला आहे.

Web Title: Farmer's daughter registered complaint against Prime Minister Narendra Modi