लाखावर शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने कर्जमाफीची योजना आणली. दोन वर्षे झाली असतानाही अद्याप जिल्ह्यातील एक लाखावर शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही. परिणामी कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणींना समोर जावे लागत असल्याचे चित्र आहे.

नागपूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने कर्जमाफीची योजना आणली. दोन वर्षे झाली असतानाही अद्याप जिल्ह्यातील एक लाखावर शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही. परिणामी कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणींना समोर जावे लागत असल्याचे चित्र आहे.
कर्जमाफीच्या निर्णयानुसार प्रथम पाच वर्षांतीलच शेतकऱ्यांची माफी करण्यात येणार होती. यानुसार दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येणार आहे. दीड लाखावर कर्ज असल्यास वरील रक्कम भरल्यावरच माफीचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे नियमित कर्जदारांना प्रोत्साहन राशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 2008 ला कॉंग्रेसप्रणीत यूपीए सरकारने कर्जमाफी दिली होती. 2008 मध्ये लाभ न मिळालेल्या आणि कर्जदार शेतकऱ्यांना याचाही लाभ होणार नसल्याचे सरकारच्या लक्षात आले. त्यामुळे कर्जमाफीची व्याप्ती वाढविण्यात आली. या कर्जमाफीसाठी सरकारकडून अनेक अटी लादण्यात आल्या. शिवाय ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. हे अर्ज भरताना शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली.
नागपूर जिल्ह्यात दीड लाखाच्या घरात शेतकऱ्यांनी अर्ज भरले. अर्ज योग्य ठरवून पात्र लाभार्थी निश्‍चित करण्यासाठी शासनाने ग्रीन लिस्ट तयार केली. नागपूर जिल्ह्यासाठी आतापर्यंत 22 ग्रीन लिस्ट तयार झाल्या आहेत. सहकार विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 18 ग्रीन लिस्ट अंतिम करण्यात आली असून, 70 हजार 350 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. 434 कोटी 44 लाख 9 हजार रुपयांची माफी झाली आहे. नव्याने आलेल्या चार ग्रीन लिस्टमध्ये सुमारे 15 हजार शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हा आकडा 85 हजारांच्या घरात जात आहे. आणखी हजारो शेतकरी पात्र ठरत असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांना नेमका केव्हा लाभ मिळेल, असाच सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
कर्जमाफी मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, अद्याप ती मिळाली नाही. सात-बारावर कर्जाचा बोझा आहे. माफी मिळत नसून कर्जही बॅंक देण्यास तयार नाही. शेतकरी खेळणी झाले आहे.
-संजय सत्यकार, शेतकरी नेते.

प्रकार शेतकरी संख्या एकूण रक्कम (लाखात)
संपूर्ण कर्जमाफी 50333 34149.31
प्रोत्साहन 14308 3201.01
ओटीएस 5709 6093.09


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers deprived of debt waiver