शेतकऱ्यांनी कर्जफेड करू नये - प्रफुल्ल पटेल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

भंडारा - आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान आपले सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे जाहीर आश्‍वासन दिले होते. परंतु, आता त्यांचेच सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आश्‍वासनाची पूर्तता होईपर्यंत शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करू नये. शेतकऱ्यांसह इतर अनेक प्रश्‍नांवरून राकॉंद्वारे येत्या 15 एप्रिलपासून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. येथील विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

श्री. पटेल यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना खर्चावर आधारित भाव मिळत नाही. येथे धान उत्पादकांना जशा अडचणी जाणवतात. तसेच केरळमध्ये नारळ उत्पादक, गुजरातमध्ये कापूस व भुईमूग उत्पादक त्रस्त आहेत. सरकारने सुरू केलेल्या नवीन पीकविमा योजनेतून एकाही शेतकऱ्याला अद्याप रुपयासुद्धा मिळाला नाही. यावर्षी एकाही शेतकऱ्याचे नैसर्गिक आपत्तीने नुकसानच झाले नाही काय? असा सवाल त्यांनी केला. 

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमध्ये असलेले शेतकऱ्यांचे पाच हजार कोटी रुपये पडून आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा या जुन्या नोटा बदलून देण्याची मागणी केली आहे. परंतु, नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांची ही रक्कम बदलून नवीन नोटा देण्यासाठी सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. आपल्या जिल्ह्यातसुद्धा 48 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे बुडून मोठे नुकसान होणार आहे. 

भाजप सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्यात एकही नवीन काम सुरू झाले नाही. बेरोजगार, शेतकरी, ग्रामीण व्यवसाय किंवा विकास या कोणत्याही क्षेत्रात एकही काम झालेले नाही. जानेवारी 2016 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 10 हजार कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन केले होते. त्यातील 10 कोटी रुपये खर्चून एकाही कामाला सुरुवात केलेली नाही. यातून आपला किती विकास होतो हे दिसून येते. 

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सामान्य जनता, शेतकरी यांच्या समस्या, अडचणी व प्रश्‍नांचा पाठपुरावा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसद्वारे 15 एप्रिलपासून मोर्चा, आंदोलने करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या तालुक्‍यांच्या ठिकाणी आंदोलने केल्यानंतर भंडारा येथे विशाल मोर्चा काढण्यात येईल. सरकार महत्त्वाच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार करत आहे. तरीही विरोधी पक्ष म्हणून आम्ही आपली जबाबदारी पूर्ण करू असेही श्री. पटेल यांनी या वेळी सांगितले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, सभापती नरेश डहारे, ऍड. जयंत वैरागडे आदी राकॉंचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Web Title: Farmers do not pay - Praful Patel