आमगावच्या या शेतकऱ्याने केली मल्चिंग पेपरवर धानशेती...भरघोस उत्पादनाची आशा

आमगाव : येथील एका शेतकऱ्याने मल्चिंग पेपरवर केलेली धानशेती.
आमगाव : येथील एका शेतकऱ्याने मल्चिंग पेपरवर केलेली धानशेती.

आमगाव (जि. गोंदिया) : धानाचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. परंतु, धानशेती करताना नांगरणी, खार टाकणे, चिखलणी, रोवणी आदी कामे करावी लागतात. त्यासाठी मनुष्यबळदेखील मोठ्या प्रमाणात लागते. धान उत्पादन खर्चही वाढतो; मात्र या सर्वाला फाटा देत मल्चिंग पेपरचा वापर करून धानशेतीचा प्रयोग बोरकन्हार येथील शेतकरी अनिकेतसिंह कटरे यांनी केला आहे.

यात कमीत कमी खतांची मात्रा, दुप्पट उत्पन्न आणि महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीची धूपदेखील थांबवली जाते. शेतकरी कटरे याआधी भाजीपाल्याची पिके मल्चिंग पेपरवर घेत होते. या वर्षी त्यांनी एक एकर क्षेत्रात मल्चिंग पेपरवर धान शेतीदेखील सुरू केली आहे.

पारंपरिक पद्धतीने धानशेती करताना भात रोपे उपटून ती पुन्हा लागवड केली जातात. धान पेरल्यानंतर त्या शेतात तण, गवतदेखील उगवते. त्यामुळे गेली अनेक वर्षे चिखल करून पुन्हा धान रोपे लावली जातात; मात्र यात धानाची मुळे दुखावतात. मल्चिंग पेपरवरील धान लागवडीमध्ये असा प्रकार होत नाही.

मशागतीचाही खर्च वाचतो

एकदा मल्चिंग पेपर अंथरला की त्यामध्ये धानपिकासह अन्य चार पिकेही घेता येतात. मशागतीचाही खर्च वाचत असल्याने ही धानशेती निव्वळ पोटापाण्यापुरतीच न ठरता भरघोस उत्पन्न देणारीदेखील ठरू शकते, असा विश्‍वास प्रयोगशील शेतकरी अनिकेतसिंह कटरे यांनी व्यक्त केला आहे.

नव्या तंत्राने धानशेती करा

दरम्यान, तालुक्‍यातील शेतकऱ्यांनीही पारंपरिक भात शेतीला फाटा देत, चारसूत्री पद्धती, श्री पद्धती, पट्टा पद्धती, सगुणा पद्धती आदी नव्या तंत्राने धानशेती करायला हवी. तरच भातशेतीमधून भरघोस तथा व्यावसायिक उत्पादन घेता येईल, असे तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी सांगितले.

अशी आहे लागवडीची पद्धत

जमिनीची मशागत करून गादीवाफे तयार करून घेतले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरला. या पेपरवर एक फूट बाय एक फुटावर दोन इंच छिद्र पाडून त्यात 1 ते 2 धानाचे दाणे टाकतात; तर दोन फुटांमध्ये अर्धाफुटावर छिद्र पाडून त्यात युरिया ब्रिकेटच्या गोळ्या टाकल्या जातात. त्यामुळे कमी मजुरांत आणि कमी पाण्यात भात लागवड होते, अशी माहिती श्री. कटरे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com