'सुट्ट्या संपूनही मंडळ कृषी अधिकारी कार्यालय कुलूपबंदच, आम्ही कितीवेळा चकरा मारायच्या?'

दीपक फुलबांधे
Sunday, 22 November 2020

आंधळगाव कृषी मंडळ अधिकारी कार्यालय मागील 13 दिवसांपासून कुलूपबंद असल्याचे समोर आले आहे. तालुका कृषी अधिकारी मिरासे यांना विचारणा केली असता दिवाळीच्या सुट्ट्या असल्याचे कारण सांगून पुढे नियमित कार्यालय सुरू राहतील असे सांगितले.

मोहाडी  ( जि. भंडारा  )  :  शनिवार, रविवार व सोमवारच्या तीन दिवस दिवाळीच्या सुट्टीनंतर मंगळवारी मुख्यालयात हजेरीचा शुभारंभ होता. परंतु, पहिल्याच  दिवशी मंडळ कृषी अधिकारी यांनी दांडी मारल्याने आंधळगाव येथील कृषी मंडळ कार्यालय 'कुलूपबंद' होते.

आंधळगाव कृषी मंडळ अधिकारी कार्यालय मागील 13 दिवसांपासून कुलूपबंद असल्याचे समोर आले आहे. तालुका कृषी अधिकारी मिरासे यांना विचारणा केली असता दिवाळीच्या सुट्ट्या असल्याचे कारण सांगून पुढे नियमित कार्यालय सुरू राहतील असे सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्यांचा आधारवड समजले जाणारे तालुका कृषी कार्यालय सध्या वाऱ्यावरच दिसत आहे. मात्र, जिल्हा कृषी अधिकारी कारवाई करीत नाही. तालुका कृषी अधिकारी यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.

हेही वाचा - आईच्या हंबरड्याने पोलिसांचे पाणावले डोळे; घरातून निघून गेलेल्या मुलाचा घेतला फास्टट्रॅक शोध 

तालुक्‍यातून शेकडो शेतकरी कामाच्या निमित्ताने येतात. मात्र, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय कुलूपबंद दिसते. तासंतास प्रतीक्षा करूनही अधिकारी येत नाही. आंधळगावला बुधवारी बाजारपेठ भरते. अनेक शेतकरी या कार्यालयात आले होते. मात्र, कृषी कार्यालय कुलूपबंद होते. 10 ते 15 किलोमीटर अंतरावरून आलेले शेतकरी वऱ्हांड्यात बसून अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत होते. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यकांना मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर काहींचे फोन बंद होते. गावात तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व सहाय्यकाचे दर्शन होत नसल्याचे आंधळगाव कृषी मंडळ येथील बाळा पाटील, नरेंद्र भोयर, अण्णा मोटघरे, उमेश पाटील, प्रकाश दमाहे, राजकुमार नागपुरे, भोला पारधी, तुळशी मोहतुरे, अनिल सिंगाडे, भीमा ठाकरे यांनी सांगितले. 

हेही वाचा - सिंचनासाठी मुबलक पाणी, पण कालव्यांच्या सफाईची बोंब

मंडळ अधिकारी विजय रामटेके, कृषी सहाय्यक गावात येत नसल्याने आम्हाला आंधळगाव येथील कार्यालय गाठावे लागते. तेथेही कार्यालय बंदच राहते. तालुक्‍याचे ठिकाणी तक्रार करावी तर, वरिष्ठही जागेवर नसतात, असे सांगितले. तालुका कृषी अधिकाऱ्यांसह, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, दिसेनासे झाले आहे. त्यांचा शोध  घ्यावा लागतो. याबाबत  माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काहीजण सुट्टीवर, तर काहीजण दौऱ्यावर गेल्याचे सांगण्यात आले. याचा फटका व मानसिक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.

हेही वाचा - गडचिरोलीत १०२ शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांची चाचणी...

शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. मंडळ कृषी कार्यालय यापुढे कुलूपबंद राहणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
-हिंदुराव चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी भंडारा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers facing problems due to agriculture office closed in mohadi of bhandara