तीन लाख हेक्टरवरील कापासाला बोंडअळी अन् बोंडसडचा फटका, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

farmers facing problems due to pink bollworm in yavatmal
farmers facing problems due to pink bollworm in yavatmal

यवतमाळ : जिल्ह्यात यंदा बोंडअळी व बोंडसळीने शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त केले आहे. तब्बल तीन लाख हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले असल्याचा अंदाज कृषितज्ज्ञांचा आहे. त्यामुळे आधीच विविध अडचणींत सापडलेले जिल्ह्यातील शेतकरी आता आर्थिक कोंडीत सापडले आहेत. 

जिल्ह्यात यंदा निसर्गाने शेतकऱ्यांची प्रतीक्षाच घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सोयाबीनचे पीक अतिपावसामुळे हातातून गेल्यानंतर कापसावरच शेतकऱ्यांची आशा टिकून होती. मात्र, कापसालाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. परतीच्या पावसाने सोयाबीनसह कापसाचे नुकसान केले. जास्त पावसाने कपाशीवर बोंडसड मोठ्या प्रमाणात आली होती. त्यात बोंडे खराब झालीत. त्यामुळेच पहिला बहर वाया गेला. त्यानंतर काही प्रमाणात पहिल्या वेच्याचा कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला. दुसऱ्या फुलोऱ्यावर कपाशी असतानाच बोंडअळीचे आक्रमण झाले. यंदा मोठ्या प्रमाणात बोंडअळी आली. मात्र, कृषी विभागाकडून पाहिजे त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. 

जिल्ह्यात यंदा चार लाख 65 हजार हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आलेली आहे. त्यामधील तब्बल दोन लाख 90 हजार हेक्‍टरवरील कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोंडअळीने 70 टक्‍क्‍यांच्यावर क्षेत्र बाधित झालेले आहे. असे असतानाही कृषी विभागाकडून प्रभावी उपाययोजना यंदा करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांच्या उत्पादनात घट सहन करावी लागली. एकरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांसमोर पुढील वर्षाच्या नियोजनाचे आव्हान उभे झाले आहे. असे असताना आता शेतकऱ्यांकडून मदतची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

माणिकराव ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट -
विदर्भात यंदा सोयाबीन, कापूस व तूर या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजनच कोलमडून टाकले. कापसावर बोंडसळ, बोंडअळीने आक्रमण केल्याने नुकसानाची पातळी वाढली आहे. या सर्व संकटांचा सामना करून शेतकरी शासनाकडे मदतीच्या आशेने पाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com