शेतकऱ्यांच्या पदरी निराशा... निराशा... निराशा... 

अनुप ताले 
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

- पीक वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड 
- सोंगणी, मळणीसाठी तिप्पट दाम मोजूनही पदरी घोर निराशाच 
- काढणीसाठी मजुरांच्या तर मळणीसाठी थ्रेशर मशीन मालकाच्या विनवण्या 

अकोला : लाखो हेक्‍टरवरील सोयाबीन पावसाने उद्‌ध्वस्त केल्यानंतरही उरलेसुरले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. काढणीसाठी मजुरांच्या तर मळणीसाठी थ्रेशर मशीन मालकाच्या विनवण्या कराव्या लागत आहेत. त्यासाठी दुप्पट, तिप्पट दाम मोजावे लागत आहे. हाती केवळ सडके सोयाबीन लागत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशाच पडत आहे. 

महिनाभर उशिरा मॉन्सूनचे आगमन, पेरणी झाल्याबरोबर महिनाभराचा पावसाचा खंड आणि त्यानंतर तीन ते साडेतीन महिने संततधार पाऊस यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले. खरिपातील हाती लवकर येणारे मूग, उडिदाचे पीक तर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये शेतातच भूईसपाट झाले. त्यानंतर सोयाबीन पीक डौलदार दिसायला लागले. परंतु, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. 

जवळपास 90 टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यानंतर पावसाने अल्प विसावा घेताच उरलेसुरले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड सुरू केली आहे. मात्र, दीर्घ काळानंतर पावसाने उघाड दिल्यामुळे एकाच वेळी सर्वत्र शेतकऱ्यांनी सोंगणी आणि झाकलेली गंजी उघडून मळणी करण्याची घाई लावली. त्यामुळे शेतमजूर आणि थ्रेशर मशीन मालकांनी त्याचा फायदा उचलत मजुरीचे दर दुप्पट, तिप्पट केले. 

हे दाम देण्यासही शेतकरी तयार झालेत; मात्र मजूर आणि मशीनच्या शोधात शेतकऱ्याची चांगलीच दमछाक होत आहे. एवढे करूनही हाती केवळ सडके सोयाबीन आणि एकरी दोन ते तीन क्विंटलची झडती लागत असल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा होत आहे. 

Image may contain: plant, tree, outdoor and nature
बियाणे गोळा करताना मजूर 

कपाळावर चिंतेच्या रेषा गडद 
तीन लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावरच्या पिकाचे नुकसान झाल्याचे सरकारच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. पीक नुकसानभरपाई तरी मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनी आणि कृषी विभागाच्या वाऱ्या सुरू केल्या. मात्र, नुकसान भरपाई निश्‍चित मिळेलच किंवा किती आणि कधी मिळेल, याबाबत अद्याप कोणतीच सूचना सरकारकडून देण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांच्या कपाळावर केवळ चिंतेच्या रेषा गडद झाल्याचे दिसत आहे. 

ढगांचा लपंडाव 
तीन दिवसांपासून पावसाने उघाड दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी, मळणीसाठी लगबग सुरू केली. गुरुवारपासून पुन्हा पावसाच्या ढगांनी लपंडाव सुरू केल्याने शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. गंजी झाकण्यासाठी ताडपत्री, तढव मिळविण्यासाठी त्यांना मोठा खर्च करावा लागत असून, गंजीची उघड-झाप करण्यासाठी कष्टही उपसावे लागत आहेत. 

मजुरी, मळणी यंत्राच्या खर्चाचा दणका 
काळणीसाठी एकरी दोन ते तीन हजार रुपये मजुरी केल्याने आणि मळणीसाठी प्रतिक्विंटल दोनशे ते तीनशे रुपये द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठा भूर्दंड सोसावा लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's frustration ... frustration ... frustration ...