विहीरगाव येथे शेतकरी उतरले रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

नागपूर:  उमरेड मार्गावरील विहीरगाव येथे पोहरा नदीचे पाणी बंधारा बांधून अडविण्यात आले आहे. परिणामी 20 ते 25 गावांमधील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. पोहरा नदीचे पाणी भांडेवाडीला जाण्यापासून प्रशासनाने तत्काळ थांबवावे, या मागणीला घेऊन सोमवारी सकाळी शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. "संघर्ष जगण्याचा' जनआंदोलन चळवळीच्या अध्यक्ष प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

नागपूर:  उमरेड मार्गावरील विहीरगाव येथे पोहरा नदीचे पाणी बंधारा बांधून अडविण्यात आले आहे. परिणामी 20 ते 25 गावांमधील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. पोहरा नदीचे पाणी भांडेवाडीला जाण्यापासून प्रशासनाने तत्काळ थांबवावे, या मागणीला घेऊन सोमवारी सकाळी शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. "संघर्ष जगण्याचा' जनआंदोलन चळवळीच्या अध्यक्ष प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पोहरा नदीवरील पाण्यावर कामठी व कुही तालुक्‍यातील पांढुर्णा, तरोडी (बु), खेडी, परसोडी, टेमसना, पांढरकवडा, कुसुंबी, आडका, झरप, खेतापूर, वरंबा, शिवणी, तितूर, चितापूर, बहादुरा आदी 20 ते 25 गावांतील शेतकऱ्यांचे सिंचन चालते. या भागातील 80 टक्‍के शेती पोहरा नदीच्या सिंचनाखाली आहे. परंतु, मागील वर्षभरापासून विहीरगाव येथे पोहरा नदीचे पाणी बंधारा बांधून अडविण्यात आले व मनपाद्वारे पोहरा पंपिंग स्टेशनमधून भांडेवाडी येथील वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये आणून शुद्ध करण्यात येत आहे. नंतर ते पाणी खापरखेडा येथील निर्माणाधीन "विश्वराज' विद्युुत निर्मिती केंद्राला 200 "एमएलडी' पाणी पुरविण्यात येणार आहे. जि.प.चे शिक्षण सभापती पुरुषोत्तम शहाणे, हुकुमचंद आमदरे, रमेश जोध, सुरेश वर्षे, आशीष मल्लेवार, वामन येवले, मनोहर कोरडे, तापेश्वर वैद्य, राजेंद्र लांडे, राजेश निनावे, डडुरे पाटील, राजेश ठवकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. 100 शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी मुंडण करून जीवघेण्या निर्णयाचा तीव्र विरोध केला. नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. प्रा. लेकुरवाळे यांच्याशी मागण्यांसंदर्भात चर्चा करून टिकले यांनी निवेदन स्वीकारले. 

हक्काचे पाणी दुसरीकडे वळविण्यासाठी प्रशासनाकडून घाट घातला जात आहे. असे झाल्यास हजारो शेतकरी सिंचनापासून वंचित राहतील आणि त्यांचा जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण होईल. 
प्रा. अवंतिका लेकुरवाळे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers landed on the road at Vihirgaon