दर्जेदार बियाणे निघाले "खबरा', लपका येथील शेतकऱ्यांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

मौदा, (जि. नागपूर) : चांगले उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी नामांकित कंपनीच्या दर्जेदार बियाण्यांची लागवड करतात. दर्जेदार बियाण्यांच्या नावावर मौदा तालुक्‍यातील लपका गावातील शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कंपनीचे बियाणे "खबरा' असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याने केला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची तक्रार घेण्यासाठी कृषी विभागही उत्सुक नसल्याचेही चित्र निर्माण झाले आहे. 

मौदा, (जि. नागपूर) : चांगले उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी नामांकित कंपनीच्या दर्जेदार बियाण्यांची लागवड करतात. दर्जेदार बियाण्यांच्या नावावर मौदा तालुक्‍यातील लपका गावातील शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कंपनीचे बियाणे "खबरा' असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याने केला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची तक्रार घेण्यासाठी कृषी विभागही उत्सुक नसल्याचेही चित्र निर्माण झाले आहे. 
लपका येथील पीडित शेतकरी किशोर कानफाडे व विश्वास येसकर यांनी वर्धा येथील दप्तरी सीड कंपनीचे 1008 या जातीचे धान बियाणे मौदा येथील एका दुकानातून विकत घेतले. त्याची योग्य वेळी पाच एकरांत पेरणी केली. या पिकाची वाढ एकसारखी जरी झाली असली तरी ते आता खबरा असल्याचे समोर आले आहे. धान शेतातील काही भागात धानाने पूर्णपणे लोंब टाकलेली आहे. तर काही धान आता गर्भ धरू लागला आहे. याची जाणकारांकडून माहिती घेतल्यावर हे बियाणे "खबरा' (वेगवेगळ्या जातींचे) असल्याचे सांगितले. 
धानाच्या विविध जातींमध्ये लोंब टाकण्याची तर गर्भ पकडण्याची व धानाची उंची यात तफावत असते. दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतात एकाच बॅगमधील बियाणे असताना वेगवेळ्या व्हेरायटी आता एकत्र दिसू लागल्या आहेत. यामुळे त्याचे निम्मे नुकसान झाले आहे. लागवडीचा पैसाही निघणार नसल्याचे शेतकरी सांगतात. याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर प्रतिनिधींनी पाहणी केली. नुकसान भरपाईबद्दल कंपनीला माहिती देणार असल्याचे आश्‍वासन देण्यात आले. या बियाण्याच्या तक्रारीबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 
पालकमंत्र्यांना दिले निवेदन 
पीडित शेतकऱ्यांनी सरकारी विभागाचे उंबरठे झिजविल्यावर अखेर नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले. त्यांच्याकडून तरी मेहनतीने शेती करणाऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी विश्वास येसकर, किशोर कानफाडे व इतर शेतकऱ्यांनी केली. 
कृषी अधिकारी दिवाळीच्या सुट्यांवर 
बियाणे खराब निघाल्यावर याची माहिती कृषी अधिकाऱ्यांना देण्यासाठी गेलो होतो, परंतु, दिवाळीच्या सुट्या असल्यामुळे पत्र घेत नाही, नंतर द्याल असे उत्तर तालुका कृषी कार्यालयातून मिळाले. पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंकज लोखंडे यांना तीन वेळा भेटायला गेलो तेदेखील सुटीवर होते. तिथेही पत्र घेतले नाही. कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांनी पीक पाहणी करून बियाणे बोगस असल्याचे मान्य केले आहे, अशी माहिती शेतकरी किशोर कानफाडे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Lapka cheat quality seeds