शेतकऱ्यांनो, बाजारू शेती नको

अनंत भोयर
अनंत भोयर

नागपूर : आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धतीमध्ये समन्वय साधून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारे अनंत भोयर यांचा नुकताच पाच लाखांचा "धरतीमित्र' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. काटोल तालुक्‍यातील कचारी सावंगा या छोट्या गावात भोयर गेल्या पंधरा वर्षांपासून नैसर्गिक पद्धतीने शेती करीत आहेत. देशीय बीजपेढी, स्थानीय पीक नियोजनपद्धती, सौरऊर्जा वाळवण संयंत्रासह विविध शेतमालप्रक्रिया आणि शेतमालाच्या मार्केटिंगमध्ये त्यांनी आजवर विविध प्रयोग केलेले आहेत. अंबाडी, जवस, तरोटा अशा पारंपरिक परंतु उपेक्षित पिकांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
प्र. ः सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीमध्ये काय फरक आहे?
उ. ः नैसर्गिक शेतीमध्ये आवश्‍यक असलेले बी-बियाणे, खते, कीडनाशके आदी शेतीमधूनच मिळविले जातात. सेंद्रिय शेतीत रासायनिक घटकांचा वापर टाळला जातो. परंतु, बाहेरून आवश्‍यक बाबी घेतल्या जातात. खरे म्हणजे यातून शेतकऱ्यांची शोषण करणारी दुसरी व्यवस्था उभी राहत आहे.
प्र. ः शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचे कारण काय?
उ. ः उत्पादनवाढीच्या मागे लागून बियाणे, शेतीतील निविष्ठा, महागडी खते आणि कीटकनाशके, तणनाशकांवरील खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लागवड खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नाही. वाढत्या शेतकरी आत्महत्या हेच दर्शवीत आहे.
प्र. ः शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत तुमचे मत?
उ. ः आपली भौगोलिक परिस्थिती आणि परदेशातील वातावरण यात खूप फरक आहे. तेथे एक शेतकरी शेकडो एकरांचा मालक आहे. त्याच्या दिमतीला आधुनिक यंत्रसामग्री असणे आवश्‍यक आहे. आपल्याकडे आहे त्या जमिनीचे तुकडे पडत आहेत. गरीब शेतकऱ्याला महागडी साधने परवडणार आहेत काय, असा माझा सवाल आहे.
प्र. ः पीक नियोजन, व्यवस्थापन कसे करता?
उ. ः एका प्लॉटमध्ये पाच ते सहा पीक घेण्याचे नियोजन असते. जैवविविधता राहावी आणि एकाच पिकाच्या मागे न लागता विविध पिकांची लागवड करण्यावर आमचा पहिल्यापासून भर आहे. यामुळे एक पीक जर काही कारणाने हातचे गेले तरी अन्य पिकांतून त्याची कसर भरून काढणे शक्‍य होते.
लागवडीआधी शेण, गोमूत्र आदींचा वापर करून बीजप्रक्रिया करण्यात येते.
प्र. ः आपण तयार केलेल्या शेतकरी गटाबद्दल सांगा...
उ. ः समविचारी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गावकुस सेंद्रिय शेती शेतकरी गटाची स्थापना केली आहे. गटामध्ये सध्या 40 शेतकरी आहेत. त्यांचे "सर्टिफिकेशन' झाले आहे. आमच्या शेतात तयार झालेल्या पदार्थांवर आम्हीच प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करतो. ठिकठिकाणी होणारी शिबिरे, प्रदर्शनांमध्ये विक्री करतो.
प्र. ः शेतमालावर प्रक्रिया, पणन आणि निर्यात कशी करता?
उ. ः आम्ही संवर्धन केलेल्या देशी बियाण्यांचाच आम्ही शेतीमध्ये वापर करतो. देशी बियाणे आणि रानभाज्या उदा. अंबाडी, मेथी, तरोटा, आंबटचुका, चंदनबथुआ, जवस, मूग, उडीद, बरबटी आदींची लागवड करतो. शेतीमालावर येथेच प्रक्रिया करून दगडांच्या जात्यावर डाळी भरडल्या जातात. लोणचे, जॅम, जेली तयार करण्यात येते. तरोट्याच्या बियांपासून कॉफी, जवसाची चटणी, कढीपत्त्यापासून मुखवास तर गवती चहापासून चहा पावडर तयार केली आहे. गावकुसमार्फत याची विक्री करण्यात येते. फोनद्वारे ऑर्डर घेतल्या जातात किंवा ग्राहक थेट संपर्क साधून खरेदी करतात.
प्र. ः आपल्याला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल सांगा...
उ. ः देशभरातून 289 शेतकरी पुरस्काराच्या स्पर्धेत होते. त्यातून 9 अर्ज निवडण्यात आले व अंतिम टप्प्यात मुलाखत घेऊन चार शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आला.
प्र. ः युवा शेतकऱ्यांना काय संदेश द्याल?
उ. ः युवकांना शेतीसाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ज्वारीसह अनेक पारंपरिक पिकांना हळूहळू मागणी वाढणारच आहे. यामुळे बाजारू शेतीच्या मागे लागू नका. शेतकऱ्यांना एवढचे सांगणे आहे की झेपणार नसेल तर हायटेक शेतीचा नाद नको.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com