शेतकऱ्यांनी आर्थिक लाभासाठी बांबूशेतीकडे वळावे : प्रंचित पोरेड्डीवार

गडचिरोली : चीनचे प्रकल्प व्यवस्थापक डेंग यांचा सत्कार करताना बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार.
गडचिरोली : चीनचे प्रकल्प व्यवस्थापक डेंग यांचा सत्कार करताना बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार.

गडचिरोली : जिल्ह्यात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आता शेतकऱ्यांनी यावर अवलंबून न राहता बांबूशेतीकडे वळावे. त्यामुळे बांबूशेती ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक लाभासाठी बांबूशेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.
डॉ. विशाल बाहेकर यांच्या नेतृत्वात चीनमधील प्रकल्प व्यवस्थापक डेंग, पेपर केमिकल इंजिनिअर फ्यू , टेक्‍स्टाइल इंजिनिअर झेंग, चेंग, विदर्भ मार्केटिंग सोसायटी लि. नागपूरचे कार्यकारी संचालक हरिबाबू यांनी देऊळगाव येथील बांबू व धानोरा तालुक्‍यातील चातगावच्या जंगलात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर बॅंकेला भेट दिली असता बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी त्यांच्या सभागृहात सत्कार करून बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पोरेड्डीवार म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जमीन आहे. त्यावर योग्य पिकाची लागवड करताना बांबू लागवडीचेही प्रयत्न करायला हवेत. अलीकडच्या काळात बांबूला बाजारपेठेत विशेषत: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात करायला हवी, असेही ते म्हणाले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बाहेकर म्हणाले, बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करून त्या निर्यात करता येतात. शेतकऱ्यांना विविध प्रकारचे शेतीतील उत्पादन निर्यात योग्य घेऊन त्यापासून पूरक उत्पादन तयार करता येते. यासाठीच चीनमधील त्या विषयातील तज्ज्ञांना मी येथे घेऊन आलो, असेही ते म्हणाले.
जिल्ह्याची निवड
जिल्हा बांबू लागवडीसाठी उपयुक्त असून येथील हवामानही यासाठी अनुकूल आहे. म्हणून बांबू लागवडीसाठी जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात बांबूचे क्षेत्र 3 लाख हेक्‍टरहून अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केली, तर तो खरेदी करण्यात येणार आहे. तसा करार बॅंकेसोबत करणार असल्याचे डॉ. बाहेकर यांनी या कार्यक्रमात सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com