शेतमजुराच्या मुलाने मारली क्रॉसकंट्रीत बाजी

विकेश शेंडे, निकिता राऊत
विकेश शेंडे, निकिता राऊत

नागपूर : शेतमजुराचा मुलगा असलेला आणि भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी विकेश शेंडे आणि वेटरची मुलगी असलेल्या चक्रपाणी कला महाविद्यालयाची निकिता राऊत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात अव्वल स्थान पटकाविले.
भंडारा जिल्ह्यातील खुटसावरी या छोट्याशा गावात प्रशिक्षकाविना विपरीत परिस्थितीत सराव करणाऱ्या 21 वर्षीय विकेशने दहा किलोमीटरची शर्यत 33 मिनिटे 29.32 सेकंदात जिंकली. गतवर्षी त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. विकेशचा सहकारी लीलाराम बावणेने दुसरे स्थान पटकाविले. मुकुंदराज स्वामी कॉलेजच्या संदेश शेबेला सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाने हुलकावणी दिली. यंदा तो तिसऱ्या स्थानावर राहिला. दोन वर्षांपूर्वीचा विजेता अजित बेंडे याने काही अंतरानंतर शर्यत सोडून दिली. महिलांमध्ये अपेक्षेप्रमाणे निकिताने बाजी मारली. इटलीतील विश्‍व विद्यापीठ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निकिताने दहा किमी शर्यत 38 मिनिटे 16.99 सेकंदात जिंकली. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या माजी विजेत्या धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या ऋतुजा शेंडेने दुसरे व लेमदेव पाटील महाविद्यालयाच्या गीता चाचेरकरने तिसरे स्थान मिळविले.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी शर्यतीला हिरवी झेंडी दाखविली. अर्जुन पुरस्कार विजेते विजय मुनीश्‍वर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन कोंगरे, डॉ. दिनेश शेराम, शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य डॉ. धनंजय वेळूकर, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य डॉ. ऊर्मिला डबीर, पीडब्ल्यूएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटील, शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, पीजीटीडी विभाग प्रमुख डॉ. माधवी मार्डीकर, डॉ. विशाखा जोशी आदी उपस्थित होते. प्रा. संजय खळतकर यांनी संचालन केले. प्रा. राजेश अलोणे यांनी आभार मानले. प्रथम सहा विजेते धावपटू येत्या सहा ऑक्‍टोबरला मुडबिद्री (मंगलोर) येथे होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धेत नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.
निकाल : (पुरुष) : विकेश शेंडे (जे. एम. पटेल, 33 मिनिटे 29.32 सेकंद), लिलाराम बावणे (जे. एम. पटेल, 33 मिनिटे 31.72 सेकंद), संदेश शेबे (मुकुंदराज स्वामी कॉलेज, सालवा, जि. भंडारा, 33 मिनिटे 47.36 सेकंद), अमित खुशवाह (तिरपुडे शा. शि. महाविद्यालय), शादाब पठाण (कला महाविद्यालय, सिहोरा), रोहित झा (चक्रपाणी महाविद्यालय), सुरज बारेकर (प्राचार्य अरुणराव कलोडे महाविद्यालय), उमेश राऊत (नबीरा कॉलेज काटोल), सौरव तिवारी (एस. एस. मनियन मॅनेजमेंट कॉलेज).
सांघिक विजेते : जे. एम. पटेल महाविद्यालय (30 गुण), हजरतबाबा ताजुद्दीन महाविद्यालय (127 गुण), सी. जे. पटेल महाविद्यालय, तिरोडा (137 गुण).
(महिला) : निकिता राऊत (श्री चक्रपाणी कला महाविद्यालय, 38 मिनिटे 16.99 सेकंद), ऋतुजा शेंडे (धनवटे नॅशनल महाविद्यालय, 39 मिनिटे 21.04 सेकंद), गीता चाचेरकर (लेमदेव पाटील महाविद्यालय, 41 मिनिटे 08.63 सेकंद), स्वाती पंचबुद्धे (हजरतबाबा ताजुद्दीन महाविद्यालय), रोशनी यादव (एस. एस. गर्ल्स गोंदिया), मीना कळंबे (एस. बी. सिटी कॉलेज).
सांघिक विजेते ः चक्रपाणी कला महाविद्यालय (32 गुण), एस. बी. सिटी महाविद्यालय (69 गुण), एन. एम. डी. महाविद्यालय, गोंदिया (87 गुण).
महत्त्वाचे :
1. नागपूर शहराबाहेरील महाविद्यालयाच्या धावपटूंनी प्रथम तीन स्थान मिळविण्याची 2012 नंतरची पहिली वेळ.
2. एकाच महाविद्यालयाच्या दोघांनी प्रथम दोन क्रमांक पटकाविण्याची 2013 नंतरची पहिली वेळ. त्यावेळी एनएमडी गोंदियाला प्रथम दोन स्थान.
3. दुसऱ्या प्रयत्नात विकेश शेंडेचे पहिलेच विजेतेपद.
4. चौथ्या प्रयत्नात निकिता राऊतचे दुसरे विजेतेपद. यापूर्वी 2016 मध्येही विजेती.
5. जे. एम. पटेल महाविद्यालयाला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद.
6. तीन वर्षांनंतर पुन्हा जे. एम. पटेलचा धावपटू विजेता. यापूर्वी 2016 मध्ये नीतेश जगनाडे.

पहिल्यांदा आंतरमहाविद्यालयीन कॉसकंट्रीचे सुवर्णपदक जिंकल्याचा मनापासून खूप आनंद झाला. भर पावसात स्पर्धा झाल्याने थोडे आव्हान अवश्‍य होते. पावसामुळे थकवा तर जाणवलाच, शिवाय "टायमिंग'मध्येही फरक पडला. अशीच कामगिरी आता पुढील स्पर्धांमध्येही कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील.
- विकेश शेंडे,
पुरुष गटातील विजेता.

ऋतुजा, गीतासह अन्य प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान असले तरी विजयाबद्दल मी सुरुवातीपासूनच आशावादी होती. सुदैवाने सुरुवात चांगली झाली. प्रारंभी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत सहज बाजी मारल्याने निश्‍चितच आनंदी आहे.
- निकिता राऊत,
महिला गटातील विजेती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com