कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानावर शेतकऱ्यांची धडक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

वरुड (जि. अमरावती) : आपल्या विविध मागण्या मान्य न झाल्याने बुधवारी (ता. 17) हजारो शेतकरी व सर्वपक्षीय नेत्यांनी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानावर धोंडी मोर्चा काढला. यावेळी काही शेतकऱ्यांनी मुंडनही केले. कृषिमंत्री व शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

वरुड (जि. अमरावती) : आपल्या विविध मागण्या मान्य न झाल्याने बुधवारी (ता. 17) हजारो शेतकरी व सर्वपक्षीय नेत्यांनी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानावर धोंडी मोर्चा काढला. यावेळी काही शेतकऱ्यांनी मुंडनही केले. कृषिमंत्री व शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
दुष्काळामुळे वाळलेल्या संत्राझाडांना प्रती झाड पाच हजारांची मदत करावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, तालुका ड्रायझोन मुक्त करावा, शेतीची कामे मनरेगा व नरेगातून करण्यात यावी, प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे, वयोमर्यादा निघून गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना 25 लाख रुपये अनुदान द्यावे, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हजारो शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक दिली.
सर्वपक्षीय नेत्यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी बैलगाडीत संत्र्याचे वाळलेले झाड व कृषिमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा ठेवला होता. सरकारविरोधी फलक हाती घेऊन पंचायत समिती मार्गावरून हा मोर्चा एक वाजता कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानी पोचला. यावेळी त्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. प्रवेशद्वारासमोर वैभव पोतदार, मनोज इंगोले, प्रफुल्ल बहुरूपी, अनिल हिवसे, जनार्दन घोरपडे, प्रदीप खापरे, रमेश कडू, गिरिधर वरठी, हरिभाऊ ठाकरे अशा 14 शेतकऱ्यांनी मुंडण केले. यावेळी पोलिसांनी 45 मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. वृत्तलिहिस्तोवर त्यांना वरुड पोलिस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केले होते.
या मोर्चामध्ये सभापती विक्रम ठाकरे, उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे, बाजार समितीचे सभापती अजय नागमोते, उपसभापती अनिल गुल्हाने, समाजकल्याण सभापती सुशीलाबाई कुकडे, जि. प. सदस्य देवेंद्र भुयार, सीमा सोरगे, राजेंद्र पाटील, बाबाराव बहुरूपी, मनोज इंगोले, राजेंद्र पाटील, राहुल चौधरी, गिरीश कराळे, अनुराग देशमुख आदी मंडळी तसेच शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers' strike at Agriculture Minister's house