शेतकऱ्याची सक्‍सेस स्टोरी, केवळ तीन एकरात साडेचार लाखांचे उत्पन्न! 

सुहास सुपासे
Saturday, 21 December 2019

बॅंका पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्याला पत्नीच्या अंगावरील दागिने विकून अथवा खासगी सावकाराकडे शेती गहाण ठेवून शेती पिकवावी लागते. याउपरही पावसाच्या लहरीपणामुळे हाती येणारे पीक मातीमोल होते.

यवतमाळ : प्रत्येकच हंगाम तोट्याचा ठरत असल्याने शेतकरी वर्ग पुरता मेटाकुटीला आला आहे. त्याच्या डोक्‍यावरील कर्जाचा भार कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस तो वाढतच आहे. अधिक नफा मिळविण्यासाठी नगदी पीक म्हणून कधी कापूस तर कधी सोयाबीनची तो पेरणी करतो. मात्र, त्याच्या मेहनतीवर कधी निसर्ग तर कधी पडका बाजारभाव पाणी फिरवून त्याची घोर निराशा करतो. या दुष्ट चक्रात सापडलेल्या अशाच एका शेतकऱ्याला मात्र, आशेचा किरण दिसला. त्याने पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत हळदीची लागवड केली. आणि काय आश्‍चर्य, त्या शेतकऱ्याला तीन एकरात चक्क लाखोंचे उत्पन्न मिळाले. यवतमाळ तालुक्‍यातील वाई (रुई) येथील शेतकरी शेख साबीर असे या कृतिशील शेतकऱ्याचे नाव आहे. 

 

Image may contain: flower, plant, nature and outdoor

कापूस पिकविणारा जिल्हा 

एकेकाळी "पांढरे सोने पिकविणारा जिल्हा' अशी यवतमाळची ओळख होती. परंतु, कालांतराने अनेक कारणांमुळे ही ओळख मागे पडून "आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा' अशी नवी ओळख या जिल्ह्याला मिळाली. कारण विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या याच जिल्ह्यात झाल्या आहेत. बॅंका पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्याला पत्नीच्या अंगावरील दागिने विकून अथवा खासगी सावकाराकडे शेती गहाण ठेवून शेती पिकवावी लागते. याउपरही पावसाच्या लहरीपणामुळे हाती येणारे पीक मातीमोल होते. पीक हाती आलेच तर त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे कुटुंबाचे पोट कसे भरावे आणि सावकाराचे कर्ज कसे फेडावे अशा द्विधा मनःस्थितीत तो सापडतो. अखेर यातून मार्ग निघत नसल्याने त्याला घशात विष ओतावे लागते अथवा गळ्यात फास लटकवावा लागतो.

 

 

अवश्‍य वाचा- सोयाबीन पाच हजाराकडे! 

 

पारंपरिक पीक पद्धतीला फाटा 

यवतमाळ तालुक्‍यातील वाई (रुई) येथील शेतकरी शेख साबीर यांनीसुद्धा सर्व व्यथा अनुभवल्या होत्या. त्यांच्याकडे केवळ साडेचार एकर शेती आहे. इतर शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनीसुद्धा आजवर कपाशीचे उत्पन्न घेतले. परंतु यातून लागवडीचा खर्चसुद्धा निघत नव्हता. कपाशीची शेती परवडणारी नाही, दुसरा पर्याय शोधला पाहिजे, असा विचार सुरू असतानाच त्यांचे मराठवाड्यात जाणे झाले. तेथील शेतकरी हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. 

 

हळदीची केली लागवड 

शेख साबीर यांनी हळद लागवडीची संपूर्ण माहिती तेथील शेतकऱ्यांकडून घेतली. त्यानंतर गेल्यावर्षी विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या किनवट तालुक्‍यातील मुडाणा येथून त्यांनी दहा क्विंटल हळदीचे बेणे विकत आणून त्यांची तीन एकरात लागवड केली. यातून त्यांना 300 क्विंटल हळदीचे उत्पादन झाले.

 

हळदीला मिळाली बाजारपेठ

जमिनीतून काढलेल्या हळकुंडाला विक्रीयोग्य बनविण्यासाठी त्यांना उकळावे लागते. त्यात क्विंटल मागे 70 किलोची घट येते. ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर शेख साबीर यांना 90 क्विंटल विक्रीयोग्य हळद मिळाली. त्यांनी ती हिंगोली येथील बाजारपेठेत विकली. सर्व खर्च वजा जाता शेख यांना साडेचार लाख रुपये नफा मिळाला. यंदाही त्यांनी हळदीची लागवड केली आहे. शेख साबीर यांचा शेतीतील हा सकारात्मक प्रयोग इतरही शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरून आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास निश्‍चितच कारणीभूत ठरू शकतो. 

मी अल्पभूधारक शेतकरी आहे. सततची नापिकी आणि निसर्गाचा लहरीपणा मीसुद्धा अनुभवला आहे. त्यामुळेच पारंपरिक पीकपद्धतीला फाटा देऊन मी हळद लागवडीकडे वळून चांगले उत्पादन घेतले. इतर शेतकऱ्यांनीही हळदीचे उत्पादन घ्यावे. याचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. 
- शेख साबीर, शेतकरी, वाई (रुई) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's Success Story, income of four and a half lakhs in just three acres!