झोलंबा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

वरुड (जि. अमरावती) : डोक्‍यावर कर्जाचा डोंगर, सततची नापिकी आणि बॅंका कर्ज देत नसल्याच्या विवंचनेत असलेल्या झोलंबा येथील युवा शेतकऱ्याने कसारी शेतशिवारातील खाणीच्या डोहामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, रविवारी उघडकीस आली.

वरुड (जि. अमरावती) : डोक्‍यावर कर्जाचा डोंगर, सततची नापिकी आणि बॅंका कर्ज देत नसल्याच्या विवंचनेत असलेल्या झोलंबा येथील युवा शेतकऱ्याने कसारी शेतशिवारातील खाणीच्या डोहामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, रविवारी उघडकीस आली.
गजानन गणेश ठाकरे (वय 34) हा अल्पभूधारक शेतकरी झोलंबा येथे परिवारासह राहत होता. त्याच्याकडे असलेल्या एक एकर जमिनीवर तो शेती करून आपला प्रपंच कसाबसा चालवित होता. गेल्या काही वर्षांपासून होत असलेली सततची नापिकी, त्यामुळे डोक्‍यावर वाढत असलेले खासगी सावकाराचे कर्ज आणि अशातच बॅंकासुद्धा कर्ज द्यायला तयार नाही. त्यामुळे आपण आपल्या परिवाराचे पालनपोषण करावे तरी कसे, याच विवंचनेत गजानन ठाकरे गेल्या काही दिवसांपासून असल्याचे बोलले जात आहे. बॅंका कर्ज देत नसल्याची तक्रार गजानन ठाकरे याने कृषिमंत्र्यांची भेट घेऊन केली होती. शनिवारी (ता.13) सायंकाळच्या सुमारास तो घरून निघून गेला आणि त्याने कसारी शेतशिवारातील खाणीच्या डोहात रात्रीच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, रविवारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच बेनोडा शहीद पोलिसांनी गजाननचा मृतदेह डोहाबाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता वरुड ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या घटनेचा तपास ठाणेदार सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेनोडा शहीद पोलिस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's Suicide at Jhollamba