अधिक कमाईसाठी त्यांनी घेतली "सगुणा'ची मदत; लागवड खर्चही करणार ती कमी

सकाळ वृत्तसेवा | Monday, 22 June 2020

जिल्ह्यासह देवरी तालुक्‍यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानपीक घेतात. धानशेती करताना नांगरणी, खार टाकणे, चिखलणी, रोवणी इत्यादी कामे करावी लागतात. त्यासाठी मनुष्यबळदेखील मोठ्या प्रमाणात लागते.

देवरी (जि. गोंदिया)  : तालुक्‍यातील धोबीसराड येथील शेतकऱ्यांनी यंदा सगुणा पद्धतीने भातपिकाची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी लागवड खर्च कमी करून नव्या पद्धतीचा वापर करावा आणि अधिक नफा मिळवावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी घनश्‍याम तोडसाम यांनी केले आहे. 

जिल्ह्यासह देवरी तालुक्‍यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानपीक घेतात. धानशेती करताना नांगरणी, खार टाकणे, चिखलणी, रोवणी इत्यादी कामे करावी लागतात. त्यासाठी मनुष्यबळदेखील मोठ्या प्रमाणात लागते. धान उत्पादन खर्चदेखील वाढते. मात्र, या सर्व कामांना फाटा देत सरसकट "सगुणा' पद्धतीचा वापर करून धान शेतीचा प्रयोग धोबीसराड येथील शेतकरी सतीश मेश्राम व मनोहर ढोक यांनी केला. या दोघांनीही मजुरांचा खर्च व उत्पन्न दुप्पट घेण्याकरिता सगुणा पद्धतीने धानपीक लागवडीचा निश्‍चय केला. मेश्राम व ढोक हे यापूर्वी पारंपरिक पद्धतीने भात पिकाची लागवड करीत होते. परंतु, वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे रोवणी होत नव्हती. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर उलट परिणाम होत होता. परिणामी, सगुणा पद्धतीने भातपीक घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 

अवश्य वाचा- तीन महिन्यांची गर्भवती माहेरी आली अन् लोटा घेऊन शौचास गेली, पुढे...

सगुणा पद्धतीचा असा आहे वापर 

भातपीक घेण्यासाठी शेतकरी मेश्राम व ढोक यांनी ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने जमिनीची उभी, आडवी नांगरणी केली. रोटावेटरच्या सहाय्याने जमीन बारीक करून घेतली. त्यानंतर लोखंडी फ्रेमचा साचा तयार केला. शेत बांधात बेड तयार केले. बेडवर साच्याच्या सहाय्याने मजुरांच्या हाताने मार्किंग करून घेतले. एका साच्याच्या सहाय्याने खड्डे तयार करून महिला मजुरांकडून प्रति खड्ड्यात भातपिकाचे 2 ते 3 बियाणे टाकून हाताच्या सहायाने खड्डे बुजविले. या पद्धतीने जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला.