शेतकऱ्याने स्वतःच तयार केली शेतीला लागणारी यंत्रे

गोपाल हागे
शनिवार, 7 डिसेंबर 2019

खारपाणपट्ट्यात ट्रॅक्टर, बैलचलीत यंत्राचा वापर

  • शेतकऱ्यांच्या गरजेनुसार तयार केले यंत्र
  • भरत काळमेघ कमी खर्चात केली यंत्र निर्मिती
  • यंत्र वापरामुळे मजुरांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत
  • कमी वेळात अधिक क्षेत्रात होते काम
  • पेरणी, खत देणे, फवारणीचे काम यंत्राच्या साह्याने

अकोला : बदलत्या काळात ग्रामीण भागात शेतीत काम करणाऱ्या मजुरांची संख्या कमी झाली. याचा ताण आता शेतीतील कामांवर पडतो आहे. शिवाय अनेक कामांसाठी मानवी श्रम हे अपुरे पडतात. अशावेळी शेतीत यांत्रिकरणाचा वापर किती सोयीचा होऊ शकतो, याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. अकोला तालुक्यात खारपाणपट्ट्यात मोडल्या जाणाऱ्या कासली बुद्रूक या गावात भरत प्रभाकर काळमेघ या तरुण शेतकऱ्याने मशागत, फवारणी, खत देणे आदी कामांसाठी यंत्राचा वापर करीत मजुरांची गरज मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. आपल्याला हव्या त्या पद्धतीचे यंत्रे तयार करून घेतली.

गरजेतून यंत्रे आली दारी
काळमेघ कुटुंबाची कासली गावात 90 एकर शेती आहे. वर्षानुवर्षे या शेतीत मजुरांकडून कामे करून घेतली जातात. ही कामे करून घेताना बऱ्याच अडचणी येत असतात. प्रामुख्याने आता गावांमध्येही मजुरांची संख्या पुर्वी होती तेव्हढीच शिल्लक आहे. नवीन पिढी शेतीतील कामांसाठी फारशी येत नाही. अशा वेळी कामे करून घेताना मोठे क्षेत्रफळ असलेल्या शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. काळमेघ कुटुंबसुद्धा याला अपवाद नव्हते.

 

अडचणींवर केली मात
शेतकरी भरत काळमेघ यांनी थोडा वेगळा विचार करीत यंत्रांचा अधिकाधिक वापर करण्याचे ठरविले. या कुटुंबाकडे 1990 पासून ट्रॅक्टर वापरले जाते. आता तर तीन ट्रॅक्टर त्यांच्या घरासमोर उभे आहेत. तीन ट्रॅक्टर, दोन बैलजोड्या याद्वारे शेतीतील कामे केली जातात. मात्र यंत्रेसुद्धा पारंपारिक असल्याने काही विशिष्ट प्रकारची मशागत करता येते. मजुरांची गरज कायम राहते. अशावेळी यंत्रांमध्ये बदल करून मजुरांवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी भरत यांनी पुढाकार घेतला. 90 एकर शेती आणि त्यातही कापसासारखे पिक मोठ्या क्षेत्रावर घेताना पेरणी ते वेचणीपर्यंत असंख्य व वारंवार कामे करावी लागतात. खत देणे, फवारणीचे काम करण्यासाठी मजुरांची पावलोपावली गरज भासत राहते. हे लक्षात घेता त्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने चालणाऱ्या यंत्राद्वारे पेरणी करणे गेल्या काही वर्षात सुरु केले. पिक मोठे झाल्यानंतर त्यात ट्रॅक्टरने मशागत करणे सोयीचे नसते. पिकाचे नुकसान होते.

Image may contain: plant, tree, sky, grass, outdoor and nature

कसा केला प्रयोग ?
पिकांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टरच्या चाकांची उंची वाढविली. सध्या गुजरातमधील उत्पादकांकडून अशा तंत्राचे ट्रॅक्टर विकले जातात. भरत यांनी अधिक उंच असलेले हे स्ट्रक्चर तयार करून त्यावर घरचे ट्रॅक्टर लावले. यामुळे आता पिकामध्ये कधीही आंतरमशागत करता येते. कपाशी सारख्या पिकात हे ट्रॅक्टर सहजपणे वापरता येते, असे ते सांगतात.

Image may contain: plant, sky, tree, grass, outdoor and nature

बैलगाडीवर वापरता येणारे फवारणी यंत्र
मोठ्या क्षेत्रात लागवड केलेल्या पिकावर फवारणीसाठी भरत यांनी यंत्र तयार केले. स्वतःच्या गरजेनुसार हे यंत्र बनवून घेतले. बाजारात या यंत्रासाठी 70 हजारांवर किमत द्यावी लागते. त्यांनी स्वतः तयार करून घेत अवघ्या 35 हजार यंत्र उभे केले. बैलगाडीवर हे यंत्र ठेवून सहजपणे पिकावर फवारणी करता येते. ही फवारणी करणे सर्वदृष्टीने फायदेशीर ठरत असल्याचे ते म्हणाले. यात प्रामुख्याने फवारणी करताना विषबाधा होण्याचा प्रकार पुर्णतः रोखता आला. यंत्राशी मजुराचा कुठलाही संपर्क येत नाही. एकमेव बैलगाडी हाकणारा व्यक्ती ते चालवितो. यंत्राची उंची-कमी जास्त करता येते. पिक जसे वाढेल तशी उंची करता येते. एकाच वेळी 10 तासांमधील पिकाची फवारणी होत असते. त्यामुळे कामालासुद्धा गती येते. समान प्रमाणात फवारणीतून द्रावण उडते. हे यंत्र बनविताना पाण्याचा एक ड्रम लावला. गाड्यांची वॉशिंग करण्यासाठी जो पंप वापरला जातो ते निवडून दीड अश्वशक्ती इंजिन असलेला पंप प्रेशर निर्माण करण्यासाठी बसविला. पेट्रोलवर हे इंजिन चालविले जाते. दिवसभरात सहा ते सात तास फवारणी केली तर दीड ते दोन लिटर एवढे पेट्रोल लागते. बैलगाडीवर चालवता येणाऱ्या या यंत्राद्वारे दिवसभरात 18 ते 20 एकरात फवारणी करू शकतो, असे भरत म्हणाले.

Image may contain: plant, sky, tree, flower, outdoor and nature

आंतरमशागत सोबतच खतही देता येते
पिकांमध्ये आंतरमशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वखर, डवऱ्याला विशिष्ट प्रकारची रचना करून खत देण्याचीही त्यांनी सोय केली आहे. दोन पापइ व त्यावर एक बकेट बसवून वखराच्या दात्याशेजारी त्यातील खत आपोआप पडू शकते. हे खत समप्रमाणात थेट पिकाला मिळते. एकाच वेळी आंतरमशागत होत असते तर दुसरीकडे खत देण्याचे काम सुरु राहते. खतावर व्यवस्थितरित्या मातीचे आच्छादन तयार होत राहते.

Image may contain: plant, tree, sky, grass, outdoor and nature

मजुरांवरचे अवलंबवित्त 60 टक्के झाले कमी
पेरणी, आंतरमशागत, फवारणीचे काम यंत्राच्या साह्याने होत असल्याने या कामांसाठी आता मजुरांची गरज 60 टक्क्यांपेक्षा अधिक कमी झाल्याचे ते म्हणाले. फवारणीचे काम बैलगाडीवरील यंत्राद्वारे दोन व्यक्ती दिवसभरात 20 एकरात करू शकतात. यासाठी दोन मजुरांची 500 रुपये मजुरी, दोन लिटर पेट्रोल हा खर्च लागतो. पुर्वी 20 एकरातील पिकावर फवारणीसाठी 100 पंप लागायचे. एक पंप फवारणीसाठी 30 रुपये मजुरी द्यावी लागते. म्हणजेच 3000 रुपये मजुरी व्हायची. आज केवळ 700 ते 800 रुपये मजुरीत ही फवारणी सुरक्षित होते. बैलगाडीला उंच चाके बसविल्याने पिकातून ती सहज चालविता येते.

Image may contain: 1 person, sky, grass, tree, outdoor and nature

शासनाने प्रोत्साहन देण्याची गरज
शासनाकडून ट्रॅक्टर व काही यंत्रांसाठी पाठबळ दिले. परंतु आता काळानुरुप यंत्राची गरज व वापरही बदलला आहे. पीक पेरणीपासून तर काढणीपर्यंत संपुर्ण कामे यंत्राद्वारे करताना तशा पद्धतीची यंत्रे हवी असतात. आम्ही गरजेनुसार ही यंत्रे बनविली. सर्वसामान्य शेतकऱ्यांना अशी यंत्रे घेण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन मिळाले तर शेतीला फायदा होईल. प्रामुख्याने आज शेतकरी प्रयोगशिल होत आहे. यासाठी अशा गरजवंत यंत्रांची निर्मिती, नवनवीन यंत्रे तालुका-जिल्‍हयाच्या ठिकाणी उपलब्ध होण्याची सुविधा देण्यासाठी शासनाचा पुढाकार हवा, अशी अपेक्षा भरत काळमेघ यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farming equipment made by the farmer himself