...अन्‌ उपोषणस्थळीच 'त्याने' लावून घेतली हळद (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

विवाह सोहळा म्हटलं की घरात कायम लगबग असते. कपड्यांची खरेदी, जेवणावळीचे नियोजन, पाहुण्यांची यादी, किरकोळ व्यवस्था आदी.

अमरावती : विवाह सोहळा म्हटलं की घरात कायम लगबग असते. कपड्यांची खरेदी, जेवणावळीचे नियोजन, पाहुण्यांची यादी, किरकोळ व्यवस्था आदी. यामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती विवाह स्थळ. लग्नकार्य असलेली मंडळी सर्व सोयींनी सुसज्ज लग्नस्थळ शोधतात. मात्र, अमरावतीत एका युवकाने चक्क विवाहासाठी चक्क उपोषण मंडपाची निवड केली आहे. एवढेच काय तर लग्नविधीला सुरुवातदेखील झाली. निखिल अरुण तिखे असे त्या युवकाचे नाव असून त्याला गुरुवारी (ता. 18) हळदसुद्धा लावण्यात आली. 

महावितरण कंपनीने बदलीप्रक्रियेत अन्याय केल्याचा आरोप करीत निखिल पाच सहकाऱ्यांबरोबर विद्युत भवनासमोर उपोषणाला बसला. महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वात 9 जुलैपासून विद्युत भवन समोर उपोषण सुरू करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्याने उपोषण लांबले. एकीकडे मागण्या मान्यही झाल्या नाही आणि दुसरीकडे निखिलच्या लग्नाची तारीखजवळ आली. त्यामुळे काही झाले तरी उपोषण सोडणार नसल्याचा जणू चंगच निखिलने बांधला. त्यामुळे सर्व लग्नविधी उपोषण मंडपातच पार पाडायचे असे त्याने ठरविले. भावी वधू पूजा शेषराव लंगडे यांच्या कुटुंबीयांनीसुद्धा या अनोख्या विवाहाला संमती दर्शविली. त्यानुसार गुरुवारी निखिलच्या हळदीचा कार्यक्रम पाडला.

यावेळी त्याच्या नातेवाइकांसह आंदोलक सहकारी प्रशांत दंडाळे, मनोहर उईके, राजीव येडतकर, दीपाली ठाकरे, नरेंद्र वंजारी यांचीही उपस्थिती होती. हळद कार्यक्रमानंतर आता शुक्रवारी उपोषण मंडपातच विवाह सोहळा पार पाडणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: at the fasting place a youth celebrates turmeric Occasion