यवतमाळ : शेतात वीजतारांच्या स्पर्शाने शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

- वीजतारांचा बसला धक्का.

- या धक्क्याने शेतकरी पिता-पुत्राचा झाला मृत्यू.

दिग्रस : येथून सात किलोमीटरवर असलेल्या वाशीम जिल्ह्यातील सावळी (ता. मानोरा) येथील शेतकरी पिता-पुत्राचा शेतात पिकाला पाणी देत असताना वीजतारांना स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी (ता.11) सकाळी साडेदहाला उघडकीस आली.

दत्ता मारोती गवळी (वय 50) व विजय दत्ता गवळी (वय 25, दोघेही रा. सावळी ता. मानोरा जि. वाशीम) असे मृत पिता-पुत्राचा नाव आहे. हे दोघेही आपल्या सावळी शिवारातील शेतात आज मंगळवारी पेरणी केलेल्या सिमला मिरचीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेले होते. त्यावेळी वीजखांबाला असलेला जमिनीतील ‘अर्थिंग‘ तारेला विजय दत्ता गवळी याचा स्पर्श झाला. त्यात तो तळपत असताना त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचे वडील दत्ता मारोती गवळी यांनाही विजेचा धक्का लागल्याने ते जागीच पडले. त्यानंतर त्यांना दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

दत्ता गवळी यांच्या मागे पत्नी, एक भाऊ, तर विजय गवळी यांच्या पश्‍चात आई, एक भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे. याबाबत दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक उदयसिंह चंदेल व त्यांचे पथक पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father and Son Died due to Electricity Shock in Yavatmal