मुलाने केला दारुड्या पित्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

नागपूर : दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या वडिलांचा रागाच्या भरात मुलाने लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना बिडगाव येथे घडली. पश्‍चात्ताप झाल्याने मुलानेच स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.

नागपूर : दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या वडिलांचा रागाच्या भरात मुलाने लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना बिडगाव येथे घडली. पश्‍चात्ताप झाल्याने मुलानेच स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.
संतोष प्रेमलाल बेनीबागडे (50) असे मृताचे नाव आहे. तो सुतारकाम करायचा. त्याला दारूचे व्यसन होते. संतोषच्या त्रासाला कंटाळून सहा महिन्यांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून आपल्या मूळ गावी गेली होती. त्यामुळे संतोष, त्याची दोन मुले सचिन, मनोज आणि मनोजची पत्नी असे चौघे राहत होते. मनोजची पत्नी गरोदर असल्याने पत्नीला घेऊन तो दवाखान्यात गेला होता. त्यामुळे सचिन एकटाच घरी होता. रात्री 11 च्या सुमारास संतोष दारू पिऊन घरी आला. संतोषने सचिनला शिवीगाळ करायला सुरुवात केली. संतोषने घरातील स्टीलचा लोखंडी रॉड उचलून सचिनच्या मागे धावला. तोच सचिनने त्याच्या हातातील रॉड हिसकावून संतोषच्या डोक्‍यावर, तोंडावर आणि छातीवर मारून त्याला जागीच ठार केले. त्यानंतर त्याने ही माहिती मोठा भाऊ मनोज यास देऊन घरी येण्यास सांगितले.
त्यानंतर लोखंडी रॉड घेऊन सचिन पोलिस ठाण्यात जात असताना ईश्वरनगर चौकात त्याला पोलिसांची गाडी दिसली. त्याने पोलिसांना वडिलांचा खून केल्याची माहिती दिली. सचिनला घेऊन त्याच्या घरी गेले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी सचिन बेनीबागडे यास अटक केली. सहायक निरीक्षक गोपाळ वळवी पुढील तपास करीत आहेत.
मनोजचा उडाला गोंधळ
मनोजची पत्नी गर्भवती असून तिला त्याने दवाखान्यात भरती केले आहे. तर दुसरीकडे पित्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारीची जबाबदारी. मोठा भाऊ पोलिसांच्या ताब्यात. त्यामुळे मनोज गोंधळून गेला आहे. वडिलांवर अंत्यसंस्कार घाईघाईत करण्यात आले आणि लगेच पत्नीची प्रकृती जाणून घेण्यासाठी दवाखान्यात पोहोचल्याची चर्चा परिसरात होती.
स्वतः झाला हजर
सचिनने रागाच्या भरात वडिलांचा खून केला. मात्र, त्यानंतर त्याला पश्‍चात्ताप झाला. त्याने लगेच पोलिसांच्या स्वाधीन होण्याची ठरविले. तो रस्त्याने जात असताना त्याला पोलिसांचे वाहन दिसले. त्याने लगेच वाहन थांबवून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.

Web Title: father kill news