नांदगावपेठमध्ये डेंगीची भीती

File photo
File photo

नांदगावपेठ (जि. अमरावती) : प्रशासनाच्या निदर्शनास आणूनदेखील तातडीने कार्यवाही न केल्याचा परिणाम गजानन कॉलनीमध्ये दिसून आला आहे. गटारगंगा साचल्यामुळे एकाच घरातील तब्बल 13 सदस्य डेंगीसदृश आजाराने फणफणत आहेत. गावातदेखील रुग्णसंख्या वाढली आहे. तथापि, या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावरच हा आजार नेमका कोणता, याबाबत निश्‍चित माहिती मिळणार आहे.
संततधार पावसामुळे गजानन कॉलनीमध्ये अनेक ठिकाणी गटार साचले आहे. काही ठिकाणी तर सांडपाण्यासह पावसाचे पाणीही साचलेले असल्याने त्या ठिकाणी डेंगीच्या मच्छरांचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत कोणतीच दखल न घेतल्याने याचे दुष्परिणाम समोर यायला सुरुवात झाली आहे. गटारगंगा साचलेल्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबातील तब्बल 13 सदस्य आजारी आहेत.
गजानन कॉलनी परिसरात कॉन्व्हेंट आणि सातवीपर्यंत शाळा असून असंख्य विद्यार्थी याच मार्गाने शाळेत ये-जा करतात. पावसाचे पाणी साचल्याने अनेक विद्यार्थी सायकल घेऊन या गटारात पडले होते. तेव्हा मोठ्या प्रयत्नांनंतर सदस्य बलवीर चव्हाण यांनी त्या ठिकाणी दोन ट्रॅक्‍टर मुरून टाकला होता. परंतु पावसाचे आणि घरातील सांडपाणी जायला मार्ग नसल्याने ते घाणपाणी एकाच ठिकाणी जमा होते. परिणामी आता कॉलनीमध्ये डेंगीसारख्या साथीच्या आजाराने तोंड बाहेर काढले असून गावकरी धास्तावलेले आहेत.

डेंगी, स्वाइन फ्लू यासारखे साथीचे आजार पावसानंतर सुरू होतात. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामपंचायतला नाली, कचराकुंडी साफ करणे, डबके बुजविणे, खत गावाबाहेर उचलून टाकणे, धूर करणे अशा सूचना दिल्या होत्या. आजपासून कोरडा दिवस पाळण्यासाठी तसेच या आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येईल.
-डॉ. जुबेर शेख,
वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नांदगावपेठ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com