भूकंपानंतर पैनगंगेच्या खोऱ्यात भीतीचे वातावरण

file photo
file photo

यवतमाळ : विदर्भ-मराठवाड्याच्या यवतमाळ-नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात शुक्रवारी रात्री 3.7 रिश्‍टर स्केल भूकंपाचे धक्‍के जाणवले. यात कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाली नाही. पैनगंगा नदीच्या खोऱ्यात भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांत कमालीची भीती पसरली आहे. सोशल मीडियावरूनही या भूंकपाच्या धक्‍क्‍याची माहितीची अफवा पसरविण्यात आली.
नांदेड येथे भूकंपमापक यंत्रावर झालेल्या नोंदीनुसार 3.7 रिश्‍टर स्केल भूकंपाची नोंद घेण्यात आली. नांदेडपासून उत्तर-पूर्वेला 95 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे नांदेड प्रशासनाने सांगितले. मोर्शी (जि. अमरावती) येथील अपरवर्धा प्रकल्पस्थळी असलेल्या भूमापक यंत्रावर 3.7 रिश्‍टर स्केलची नोंद करण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू 160 किमी अंतरावर असल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी दिली. तहसीलदार, मंडळ अधिकारी व पटवारी यांनी भूकंपाचे धक्‍के बसलेल्या गावात जाऊन लोकांना सुरक्षितस्थळी आश्रय घेण्याचे आवाहन केले. दोन-तीन घरांना गेलेले तडे सोडले, तर कुठेही भूकंपाचा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. यवतमाळ जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांतील 24 गावांना तर नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हिमायतनगर तालुक्‍यातील गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले. काही मिनिटे जाणवलेल्या हादऱ्यांची माहिती जिल्हाभरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, दिग्रस, महागाव, घाटंजी, आर्णी तसेच दारव्हा या सहा तालुक्‍यांतील गावांना भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, पोलिस प्रशासन, आपत्ती विभाग "हायअलर्ट'वर होते. सर्व कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. तसेच ज्या 24 गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, त्या भागात तहसीलदारांपासून तर तलाठ्यांनी रात्री गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com