वीज मनोऱ्यांसाठी चारपटीने मोबदला - चंद्रशेखर बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नागपूर - वीज कंपन्यांतर्फे शेतांमध्ये उभारण्यात येणाऱ्या वीज मनोऱ्यांसाठी (टॉवर) शेतकऱ्यांना नव्या भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावापेक्षा चारपटीने मोबदला दिला जाईल. यासाठी नवे धोरण लवकरच लागू होईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात केली.

सोलापूर जिल्ह्यातील वीजवाहक टॉवरसाठी शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळत नसल्याबाबत बबनराव शिंदे यांनी प्रश्‍न विचारला होता. या वेळी सदस्यांनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. शेतकऱ्यांचे पीक उभे असताना टॉवर उभारलेले जातात. यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. या चर्चेत सुनील केदार, जयदत्त क्षीरसागर यांनी उपप्रश्‍न विचारले होते.

सदस्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, राज्यात चार वीज कंपन्यांतर्फे टॉवर उभारले जात आहेत. या टॉवर वाहिनीला प्रतिबंध घालता येत नाही. यात शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा व्हावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारने संमत केलेल्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना चारपट मोबदला मिळेल. याशिवाय शेतकऱ्यांना अधिक फायदे देता येईल काय? यासाठी लवकरच धोरण ठरविण्यात येणार असून येत्या 15 दिवसात मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, असे आश्‍वासन बावनकुळे यांनी दिले.

या वेळी सुनील केदार यांनी शेतात उभे पीक असताना टॉवर उभारणीचे काम करू नये, अशी सूचना सरकारला केली. टॉवर उभारणीपूर्वी वीज कंपन्यांनी शेतकऱ्यांची पूर्व परवानगी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या सूचनांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्‍वासन मंत्र्यांनी दिले.

Web Title: fee increase for electricity tower