अखेर महिला डॉक्‍टरला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नेर (जि. यवतमाळ) : शहरात अनधिकृत थाटलेल्या ताज नर्सिंग होमच्या वादग्रस्त महिला डॉक्‍टरवर अखेर नेर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला डॉक्‍टरला आज, मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. तिला न्यायालयापुढे हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

नेर (जि. यवतमाळ) : शहरात अनधिकृत थाटलेल्या ताज नर्सिंग होमच्या वादग्रस्त महिला डॉक्‍टरवर अखेर नेर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला डॉक्‍टरला आज, मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. तिला न्यायालयापुढे हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
डॉ. शबाना मिर्झा (रा. नेर) असे अटक करण्यात आलेल्या महिला डॉक्‍टरचे नाव आहे. संबंधित महिला डॉक्‍टरने नेर शहरात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अनधिकृत ताज नर्सिंग होम थाटले होते. कुठलाही परवाना नसताना महिलांची प्रसूती व उपचार या ठिकाणी करीत होती. बानगाव येथील वनिता अभिजित चव्हाण (वय 20) ही महिला प्रसूतीसाठी नर्सिंग होममध्ये दाखल झाली होती. तिचा चुकीच्या उपचारामुळे 14 मे 2018 ला मृत्यू झाला होता. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी मृत महिलेचा मृतदेह पोलिस ठाण्यात आणून महिला डॉक्‍टरच्या अटकेची मागणी केली होती. या घटनेनंतरही नर्सिंग होम सुरूच होते. चार जुलै 2018 ला टाकळी सलामी येथील जयश्री उमेश बोरकर (वय 30) या महिलेचाही याच नर्सिंग होममध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळीही नातेवाइकांनी नेर पोलिसात तक्रार दिली होती. नेर येथील हनुमाननगरातील राणी शेख निसार (वय 19) या गर्भवती महिलेचाही मृत्यू झाला होता. या तीनही प्रकरणावरून नेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई होऊनदेखील नर्सिंग होम सुरूच होते. वादग्रस्त नर्सिंग होमचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आरोग्य विभागाला मागितला होता. त्यावरून तीन जूनला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंग तुषार वारे यांच्या पथकाने सदर अवैध नर्सिंग होमवर छापा टाकत तब्बल सहा तास कसून चौकशी केली होती. सदर अहवाल पोलिस अधीक्षकांना सादर केला होता. हा चौकशी अहवाल व तक्रारीच्या आधारावर नेर पोलिसांनी आज, मंगळवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून डॉ. मिर्झाला अटक केली. तिला नेर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female doctor finally arrested