फसवणूक करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर : पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सैयद शाबीर जाबीद अली सय्यद (38, महाजन कॉम्पलेक्‍स मागे, झिंगाबाई टाकळी) असे आरोपी पतीचे नाव आहे.

नागपूर : पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सैयद शाबीर जाबीद अली सय्यद (38, महाजन कॉम्पलेक्‍स मागे, झिंगाबाई टाकळी) असे आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैयद शाबीरला पत्नी आणि दोन मुली आहेत. तक्रारकर्ती महिला अंजू सय्यद शाबीर (38) यांचेही लग्न झाले असून, पहिल्या पतीपासून त्यांना दोन मुले आहेत. पहिल्या पतीने अंजूला घटस्फोट दिला होता. एका कार्यक्रमात अंजूची शाबीरसोबत ओळख झाली होती. अंजूच्या भावाला दारूचे व्यसन होते. आरोपी सैयद शाबीर व्यसनी लोकांची दारू सोडवितो, हे अंजूला माहिती होते. त्यामुळे दोघांची ओळख होऊन जवळीक निर्माण झाली. त्यानंतर शाबीरने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे सांगून अंजूसोबत लग्नाचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने घोडगाव, जि. वर्धा येथील पाच एकर शेती अंजूला बक्षीसपत्राद्वारे दिली होती. त्यामुळे अंजूचा त्याच्यावर विश्वास बसला. 2014 मध्ये त्यांनी लग्न केले आणि निबंधक कार्यालयात नोंदणी पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर दोघेही नरेंद्रनगर येथील नगरविकास हाउसिंग सोसायटी येथे राहायला आले.
शाबीरने काहीतरी कामधंदा करावा म्हणून अंजूने स्वत:च्या नावे कर्ज काढून त्याला स्कार्पिओ गाडी घेऊन दिली. शाबीरमार्फत 10 ते 15 तोळ्यांचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून एक प्लॉट खरेदी केला. दरम्यान, त्याने स्कार्पिओ गाडीची आणि प्लॉटची परस्पर विल्हेवाट लावली. तसेच शेतीच्या कागदपत्रांची तपासणी केली असता त्या शेतीमध्ये त्याच्या भावाचा हिस्सा असल्याचे लक्षात आले. अंजूने त्याला गाडी आणि दागिने परत मागितले असता त्याने तिला धमक्‍या द्यायला सुरुवात केली.
या प्रकरणी अंजूने शहर गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. अपर पोलिस आयुक्त नीलेश भरणे यांनी तिला मानकापूर पोलिस ठाण्यात पाठविले. मानकापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील कारवाईसाठी हे प्रकरण बेलतरोडी पोलिसांकडे पाठविले. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून फरार झालेल्या शाबीरचा शोध सुरू केला आहे.
......


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: File a crime against a cheating spouse