Video : अखेर गोवरी बंधाऱ्याचा वनवास संपला...शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

राजुरा : सुरू असलेले अर्धवट बंधाऱ्याचे सुधारित बांधकाम.
राजुरा : सुरू असलेले अर्धवट बंधाऱ्याचे सुधारित बांधकाम.

राजुरा (जि. चंद्रपूर) : बल्लारपूर वेकोलि क्षेत्राने वेढलेल्या भागातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी 2006 मध्ये गोवरी येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन झाले. मात्र निधीअभावी बंधाऱ्याचे बांधकाम अर्धवटच राहिले होते. तब्बल 14 वर्षांनंतर सुधारित बांधकामासाठी 67 लाखांचा निधी मंजूर झाल्याने नष्ट होण्याच्या तयारीत असलेल्या बंधाऱ्याला पुन्हा संजीवनी मिळालेली आहे.

मात्र यासाठी तब्बल चार आमदारांचा कालखंड लोटला आहे. प्रभू श्रीरामाच्या वनवासाप्रमाणे 14 वर्षानंतर निधीचा वनवास संपला आहे. गोवरी येथील नाल्यावरील अर्धवट बांधकाम झालेल्या बंधाऱ्याची ही वस्तुस्थिती आहे.

चार आमदारांचा कालखंड लोटला

गोवरी नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे अर्धवट बांधकाम मागील 14 वर्षापासून निधीअभावी बंद पडलेले होते. चार आमदारांचा कालखंड लोटल्यानंतर अखेर बंधाऱ्याचा सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली. माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या कार्यकाळात ही मंजुरी मिळाली. माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांच्या हस्ते या बंधाऱ्याचे भूमिपूजन झाले; तर सुभाष धोटे यांच्या कार्यकाळात बांधकामाला सुरुवात झाली. निधीअभावी बांधकाम अर्धवट राहिले होते. माजी आमदार ऍड. संजय धोटे यांच्या पुढाकारातून सुधारित बांधकामासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधीस मंजुरी मिळाली. यासाठी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य सुनील उरकुडे व शेतकऱ्यांनी मागील दहा वर्षापासून पाठपुरावा केलेला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भूमिपूजन

अर्धवट बंधाऱ्याच्या सुधारित बांधकामासाठी लघुसिंचन विभागाने 67 लाखांचा अंदाजपत्रक तयार केला होता व शासनाकडे सादर करण्यात आलेला होता. माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कामाचे भूमिपूजनही आटोपण्यात आले होते.
बल्लारपूर वेकोलि क्षेत्राअंतर्गत गोवरी परिसर कोळसा खाणींचे वेढलेला आहे. वेकोलिने या भागातील सिंचनासाठी कधी पुढाकार घेतला नाही. भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे; त्यामुळे या क्षेत्रात पाणीटंचाईचे स्वरूप गंभीर होते. प्रकल्पामुळे जवळपास तीनशे एकर जमीन ओलिताखाली येईल. शिवाय भूजल पातळी झपाट्याने खाली जात असल्यामुळे बंधारा बांधल्यास या भागातील भूजल पातळी वाढेल. शिवाय जनावरांना पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण होईल. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होणार आहे.

प्रत्यक्ष कामाला सुरुवात

पावसाळ्यात गोवरी गुडा येथील विद्यार्थी रस्त्याअभावी शिक्षणापासून वंचित राहत होते. या बंधाऱ्याच्या वरून रस्ता तयार करण्यात येत असल्यामुळे गोवरी गुडा गावाला जोडला जाईल व नागरिकांना विद्यार्थ्यांना येण्या-जाण्याची सुविधा निर्माण होईल. अनेक वर्षानंतर या बंधाऱ्यासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. बंधाऱ्याच्या माध्यमातून या भागातील हरित क्रांतीचे स्वप्न पूर्ण होईल व पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल अशी आशा नागरिकांना आहे.

पाण्याची पातळी वाढणार

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील गोवरी, पवनी, गोयेगोव, चिंचाली, साखरी, बाबापूर, सास्ती परिसरातील नाले दिवाळीनंतरच कोरडे पडत आहेत. त्यामुळे उन्हाळ्याअगोदरच जनावरासाठी पाण्याचे संकट निर्माण होत आहे. परिसरातील नाल्यावर कुठल्याही प्रकारे पाणी अडविण्यासाठी उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांची पाण्यासाठी बोंब असते. गोवरी गावालगतच मोठा नाला वाहतो. वेकोलित मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा होत असल्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली गेली आहे. मात्र वेकोलिने बंधारे तयार केल्यास या भागात सिंचनाची सुविधा निर्माण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com