भूखंड गैरव्यवहारप्रकऱणी भाजपच्या मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

- भाजपच्या मंत्र्यासह 17 जणांविरुद्ध दाखल करण्यात आला गुन्हा.

यवतमाळ : शहराच्या मध्यवस्तीत असलेला भूखंड बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी-विक्री केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने अखेर पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरुद्ध अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

भूखंड प्रकरणात पोलिस प्रशासनाकडे धाव घेऊन न्याय न मिळाल्याने आरुषी किरण देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी (चौथे) राजकिरण इंगळे यांनी या प्रकरणात गुन्हा नोंद करण्याचे आदेश मंगळवारी (ता.14) दिले. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, काल गुरुवारी (ता.16) उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पालकमंत्री मदन येरावार (वय 55, रा. यवतमाळ), भाजपचे जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन गुणवंत कोल्हे (वय 64, रा. झाडगाव), जयश्री दिवाकर ठाकरे (वय 63, रा. उमरेड), विजश्री विजय कारेकर (वय 57, रा. नागपूर), जयंत गुणवंत कोल्हे (वय 50, रा. नागपूर), राजश्री उर्फ श्‍वेता संजय देवतळे (वय 48, रा. वरोरा), तेजश्री विजय थुटे (वय 44, रा. वर्धा), दिलीप अनंत कोल्हे (वय 55), अर्चना शशीशेखर कोल्हे (वय 52), आशीष शशीशेखर कोल्हे (वय 32), वैशाली बाळासाहेब कोल्हे, अमोल बाळासाहेब कोल्हे (वय 30), शीतल रवी धोटे (वय 29, रा. राजुरा), अमित कमलकिशोर चोखाणी (वय 34, रा. यवतमाळ), भूमिअभिलेखचे तत्कालीन उपअधीक्षक, तत्कालीन मुख्याधिकारी, सहायक दुय्यम निबंधक क्रमांक एक यांचा समावेश आहे.

शासकीय कागदपत्रांत खोडतोड

यवतमाळच्या अवधूतवाडी येथील एकूण नऊ हजार 241 चौरस फूट भूखंडाचे प्रकरण आहे. त्यापैकी दोन हजार 309 चौरस फूट जागा किरण देशमुख यांनी खरेदी केली होती. मात्र, कोल्हे कुटुंबीयांनी सात हजार 887 चौरस फुटांऐवजी थेट नऊ हजार 241 चौरस फूट जागेची विक्री मदन येरावार व अमित चोखाणी यांना 2013 व 2016मध्ये केली. किरण देशमुख यांची मालकी लपविण्यासाठी शासकीय कागदपत्रांत खोडतोड करण्यात आल्याचा आरोप आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR Registered against Minister Madan Yerawar