चिकन सेंटरला आग; जिवंत कोंबड्यांचे झाले "चिकन फ्राय' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन (ता. झरीजामनी) येथे मंगळवारी सायंकाळी गॅस सिलिंडरचा पाईप लिक झाल्याने अख्ख्या दुकानाला आग लागली. आगीत चिकन सेंटरमधील जिवंत कोंबड्या जळून खाक झाल्या. 

झरी जामणी (जि. यवतमाळ) : चिकन सेंटरमध्ये गॅस सिलिंडरच्या पाईपमधून गॅस गळती झाल्याने लागलेल्या आगीत अख्खे दुकान जळून खाक झाले. ही घटना झरी तालुक्‍यातील मुकुटबन येथे मंगळवारी (ता. 22) संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. 
मुकुटबन ते पाटण मार्गावर असलेल्या साई जिनिंगसमोर ए.एन.एन. चिकन सेंटर आहे. या दुकानाचे मालक सय्यद हारून सय्यद ख्वाजा यांचा नेहमीप्रमाणे दुकानात चिकन विक्रीचा व्यवसाय सुरू होता. मंगळवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास गॅस सिलिंडरच्या रेग्युलेटरजवळील पाईपने अचानक पेट घेतला. पाहता पाहता आगीने रुद्र रूप धारण केले. चिकन सेंटरला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा भडका खूप मोठा असल्यामुळे आग नियंत्रणात आणणे कठीण झाले होते. त्यानंतर मुकुटबन येथील आरसीसीपीएल ऍन्ड एमपी बिर्ला ग्रुपच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मुकुटबन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक युवराज राठोड, जमादार कुळमेथे, सुलभ उईके, होमगार्ड ताडुरवार, अग्निशामक वाहनचालक बळवंत कातरकर, पवन साळवे, अरुण व्यास, नितीन बावनकर, तलाठी राणे, कोतवाल सन्मुखानंद कांबळे आदींनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत 50 हजार रुपये किमतीच्या 500 किलो जिवंत कोंबड्या आणि दोन लाखाचे शेड असे मिळून दोन लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire to the chicken center; Living chickens become "chicken fry"