औषधबाजाराला आग, 60 दुकाने भस्मसात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

नागपूर ; गंजीपेठ या गजबजलेल्या भागातील होलसेल औषध बाजाराला लागलेल्या आगीत कोट्यवधींची औषधे भस्मसात झाली. या आगीत जवळपास 60 दुकानांतील औषधे जळून नष्ट झाली असून रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशमन जवानांचे प्रयत्न सुरू होते. या आगीमुळे परिसरात औषधीयुक्त गंध असलेल्या धुराने परिसरातील नागरिकही त्रस्त झाले. गुरुवारी रात्रीला आग लागल्याने दुकानांमध्ये कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.

नागपूर ; गंजीपेठ या गजबजलेल्या भागातील होलसेल औषध बाजाराला लागलेल्या आगीत कोट्यवधींची औषधे भस्मसात झाली. या आगीत जवळपास 60 दुकानांतील औषधे जळून नष्ट झाली असून रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशमन जवानांचे प्रयत्न सुरू होते. या आगीमुळे परिसरात औषधीयुक्त गंध असलेल्या धुराने परिसरातील नागरिकही त्रस्त झाले. गुरुवारी रात्रीला आग लागल्याने दुकानांमध्ये कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.
गंजीपेठ येथील हजहाउसला लागून संदेश औषध बाजाराची पाच मजली इमारत आहे. या इमारतीत एकूण तीनशे दुकाने असून होलसेल औषधी खरेदी-विक्री केली जाते. काल, गुरुवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास या इमारतीतील एका माळ्यावर आग लागली. औषधीसह बॅन्डेज पट्टी, जखमेवर लावण्यात येणारा कापूस तसेच काही ज्वलनशील औषधांमुळे आगीने काही वेळातच संपूर्ण इमारत कवेत घेतली. सव्वा दोनच्या सुमारास येथील नागरिकांना आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. परिसरातील नागरिक व सुरक्षारक्षकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. अग्निशमनचे जवान येईस्तोवर आगीने उग्र रूप धारण केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांतही भीती निर्माण झाली. काही वेळातच अग्निशमन विभागाच्या सर्वच केंद्रावरील बंब येथे आले. जवानांनी आगीवर पाण्याचा मारा केला. आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू असताना औषध व्यापारीही येथे पोहोचले. संपूर्ण इमारतीतील दुकानांमध्ये आग बघताच या व्यापाऱ्यांनाही धक्का बसला. अग्निशमन जवानांनी रात्रभर पाण्याचा मारा केला. त्यामुळे व्यापाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनाही संपूर्ण रात्र जागून काढावी लागली. आज सकाळपासून अग्निशमन जवानांनी पाण्याचा मारा सुरू केला. रात्रीपर्यंत आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू होते. मात्र, आग आटोक्‍यात आली नाही. आगीच्या धुराने अग्निशमन जवानांनाही आगीवर पाण्याचा मारा करताना चांगलीच कसरत करावी लागली.
सकाळी आग पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. नागरिकांना आगीजवळ जाण्यापासून रोखणे व आग विझविणे, या दोन्ही आघाड्यांवर जवान काम करीत होते. आगीमध्ये 60 दुकानांतील संपूर्ण औषधांची राख झाली. दुकानातील फर्निचर, संगणक, विद्युत दिवे, फ्रीज आदी जळाले. संगणक जळाल्याने हिशेबाचा "डाटा'ही नष्ट झाला असल्याची शंका काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. ही आग विझविण्यासाठी 11 अग्निशमन बंब लावण्यात आले. आग विझविण्यासाठी हज हाउस, गांधीसागर, एशियन हॉटेल येथील पाणी वापरण्यात आले. आगीची तीव्रता बघता आज सायंकाळी आणखी 9 बंब बोलावण्यात आले. मात्र, रात्रीपर्यंत आठही अग्निशमन केंद्रातील अधिकारी, अग्निशमन जवान तसेच बंबाद्वारे आगीवर नियंत्रणाचे काम सुरू होते. दुकानांचे शटर तोडून आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. आगीच्या ज्वाळा दिसत नसल्या तरी प्रचंड धुरामुळे आगीची माहिती काही क्षणातच नागरिकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे बघ्याचीही मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. आगीसह नागरिकांवर नियंत्रणासाठी प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, अग्निशमन केंद्र अधिकारी नाकोड, राजेंद्र दुबे, मनोज गुडधे, अनिल गोळे, सुनील डोकरे, रमेश बरडे, भगवान वाघ आज दिवसभर तसेच रात्रीपर्यंत तळ ठोकून होते.
इमारतीत अग्निशमन यंत्रणेचा अभाव
या इमारतीसाठी कम्प्लायन्स सर्टिफिकेट (परिपूर्णता प्रमाणपत्र) देण्यात आले होते. परंतु, या इमारतीतील हायड्रंट, स्प्रिंकलर सिस्टिम आगीदरम्यान बंद अवस्थेत आढळून आले. त्यामुळे कम्प्लायन्स सर्टिफिकेट देण्यापूर्वी अग्निशमन यंत्रणेबाबत अग्निशमन विभागाने तपासणी केली की नाही? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
पालकमंत्री बावनकुळेंनी दिली भेट
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगीच्या घटनास्थळाला भेट देऊन आगीचे कारण जाणून घेतले. या संदर्भात लवकरच योग्य तो कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते. याशिवाय दिवसभरात नागरिकांचीही ये-जा सुरू होती.

Web Title: Fire in the drug market