अग्‍नितांडव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

नागपूर - मोठा ताजबाग परिसरात सिलिंडर गळतीमुळे आग लागून दोन झोपड्या जळून खाक झाल्या. या दोन्ही झोपड्यातील घरगुती साहित्य नष्ट झाले आहे. दहा लाखांवर नुकसान झाले. आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन विभागाला दोन तास संघर्ष करावा लागला. आगीतून गॅस सिलिंडर बाहेर काढले असता त्याला तडे गेल्याचे दिसून आले. आणखी काही वेळ सिलिंडर आगीत राहिले असते, तर त्याचा स्फोट होऊन परिसरात आगडोंब उसळला असता, असे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने नमूद केले. 

उमरेड रोडवरील मोठा ताजबाग परिसरातील झोपडपट्टीत प्यारू पहेलवान ऊर्फ सय्यद मुजफ्फर अली यांचे घर असून त्यांच्या दोन झोपड्या भाड्याने दिल्या आहेत. यातील एक झोपडी नझीर हुसेन शेख अली यांना तर एक झोपडी मोहंमद रफीक यांना भाड्याने दिली आहे. या दोन्ही झोपड्यांना दुपारी एकच्या सुमारास आग लागली. एकमेकांना लागून असल्याने दोन्ही झोपड्यांत एकाचवेळी आग लागल्याने स्थानिक नागरिकांत खळबळ उडाली. आग लागल्याचे बघताच परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसही मोठा ताजबाग परिसरात पोहोचले. परंतु, अग्निशमन विभागाचे बंब विलंबाने पोहोचल्याचे नमूद करीत परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. अग्निशमन विभागाचे चार बंब येथे पोहोचले. लहान लहान रस्ते असल्याने अग्निशमन विभागाच्या बंबाला पोहोचण्यास कसरत करावी लागली. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु, तोपर्यंत दोन्ही झोपड्यातील घरगुती साहित्य जळून खाक झाले. आग विझविल्यानंतर दोन्ही झोपड्यातील सिलिंडर सर्वप्रथम बाहेर काढण्यात आले. या सिलिंडरला तडे गेल्याचे लक्षात आले. वेळीच सिलिंडर बाहेर काढून गळती रोखण्यात आली, अन्यथा स्फोटाची शक्‍यता होती, असे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे या परिसरातील अनेक झोपड्या बचावल्या. या आगीत नाझिर हुसेन शेख अली यांचे आठ लाखांचे तर मोहम्मद रफिक यांचे दोन लाखांचे नुकसान झाल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. आग विझविण्यासाठी सक्करदरा, लकडगंज, गंजीपेठ, कॉटन मार्केट येथून बोलावण्यात आलेल्या प्रत्येकी एक बंबाच्या मदतीने आग आटोक्‍यात आणण्यात आली. अग्निशमन अधिकारी सुनील डोकरे यांच्या मार्गदर्शनात जवानांनी आग विझविली. झोपडी जळालेले मोहम्मद रफिक कुटुंबासह हैदराबाद येथे गेले होते, त्यामुळे त्यांचे कुटुंब बचावले. 

Web Title: fire in nagpur