मोबाईलमुळे पेट्रोलपंपावर आग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

पंपावर नव्हती सुविधा
आग लागल्यानंतर तेथील काही कर्मचाऱ्यांनी पळ काढला तर काहींनी आग विझविण्यासाठी थातूरमातून प्रयत्न सुरू केले. पंपावर सुरक्षेकरिता असलेली पुरेशी साधने नव्हती. यातील काही नादुरुस्त असल्याने दोन वाहनेसुद्धा पेट्रोलपंपमालकाला वाचविता आली नाही. यावरून पेट्रोलपंपावर एखादी मोठी घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याचे नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे.

नागपूर - पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत असताना मोबाईल वापरल्यामुळे दोन दुचाकींना आग लागली. या आगीत दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या. मात्र, सुदैवाने या आगीत पेट्रोलपंपाला आग लागली नाही. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली. ही आगीची घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास टेलिफोन एक्‍स्चेंज चौकातील इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोलपंपावर घडली. 

राजेश जिंदल याच्या मालकीचा हा पंप असल्याचे सांगितल्या जाते. आज सकाळी पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक बादलीत पेट्रोलचे सॅम्पल घेत होते. दरम्यान, पेट्रोलपंपावर आलेला एक दुचाकीस्वार वाहनचालक मोबाईलवर बोलत होता. कुणाला काही कळण्यापूर्वीच मोबाईलच्या रेडिएशनमुळे आगीचा भडका उडाला. बादलीतील उघड्या पेट्रोलला आग लागली. आगीने भडका घेताच बादली उलटली आणि पेटत्या पेट्रोलने पंपावरील दोन दुचाकी वाहने व वेंडिंग मशीन जळून खाक झाली.

सूत्रानुसार, पेट्रोलपंपावरील पेट्रोलची दररोज तपासणी केली जाते. कर्मचारी जर्मनच्या कॅनमध्ये पेट्रोल तपासणीसाठी काढत असताना एक वाहनचालक मोबाईलवर बोलत होता. मोबाईलच्या रेडिएशनमुळे पेट्रोलचा भडका उडाला. यात हरीश बोकडे यांची (एमएच ४-जी -एजी ७७५६) क्रमांकाची होंडा व घनश्‍याम चांदेकर यांची (एमएच ३१-९७६५) क्रमांकाची प्लेझर अशा दोन गाड्या आगीत जळून खाक झाल्या. तसेच वेंडिंग मशीन जळाली. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला तसेच अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली. 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे चार फायरटेंडर घडनास्थळी पोहोचले. जवानांनी थोड्याच वेळात ही आग आटोक्‍यात आणली. आग नेमकी मोबाईलवरील संभाषणामुळे लागली की, अन्य कारणामुळे, याचा शोध घेतला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वातावरण संतप्त 
दुचाकी जळाल्यानंतर वेळीच पाणी, फायर इन्स्टिग्युशर आणि रेतीने भरलेल्या बादल्या मिळाल्या नाहीत. त्यामुळेच वाहने जळाल्याचा आरोप काहींनी केला. त्यामुळे पेट्रोलपंपवर वातावरण चांगलेच तापले होते. व्यवस्थापकाशी वाद घालतानाचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire on Petrol Pump by Mobile