पेट्रोल टॅंकर उलटल्याने भीषण आग; दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

नागपूर - ओव्हरटेक करीत असलेल्या वाहनाला साईड देताना पेट्रोल व डिझेलचे टॅंकर उलटल्याने आग लागली. यात एकाच होरपळून मृत्यू झाला, तर ड्रायव्हर व कंडक्‍टर गंभीर  जखमी झाले. २० हजार लिटर इंधन असलेल्या टॅंकरच्या आगीवर अग्निशमन विभागाच्या जवानांनी तत्परतेने पोहोचून पाण्याचा मारा केल्याने मोठा स्फोट टळला. आगीच्या मोठ्या ज्वाळामुळे अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतल्याने जामठा मार्गावर चांगलीच गर्दी झाली. 

नागपूर - ओव्हरटेक करीत असलेल्या वाहनाला साईड देताना पेट्रोल व डिझेलचे टॅंकर उलटल्याने आग लागली. यात एकाच होरपळून मृत्यू झाला, तर ड्रायव्हर व कंडक्‍टर गंभीर  जखमी झाले. २० हजार लिटर इंधन असलेल्या टॅंकरच्या आगीवर अग्निशमन विभागाच्या जवानांनी तत्परतेने पोहोचून पाण्याचा मारा केल्याने मोठा स्फोट टळला. आगीच्या मोठ्या ज्वाळामुळे अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतल्याने जामठा मार्गावर चांगलीच गर्दी झाली. 

मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास टॅंकर (एम एच ३१ डीएस ७६) पेट्रोल व डिझेल  घेऊन बोरखेडीवरून मनसरजवळील आमडीकडे जात होता. पेट्रोल व डिझेल आमडी येथील  भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपवर रिते करण्यासाठी हे टॅंकर जात होते. त्याचवेळी टॅंकरच्या मागून येणाऱ्या वाहनाला साईड देण्यासाठी टॅंकरचालक संतोष मारबतेने टॅंकरचे स्टेअरिंग फिरवले. त्यामुळे चालक मारबतेचे स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने टॅंकर उलटला व त्याला आग लागली. टॅंकरला आग लागल्याचे दिसताच परिसरातील नागरिकांनी हिंगणा पोलिसांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला बोलावले. हिंगणा पोलिसांसह नरेंद्रनगर, कॉटन मार्केट, एमआयडीसी, मिहान येथील अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना केले. नरेंद्रनगर अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी एस. एन. भोयर, कॉटन मार्केट अग्निशमन केंद्राचे अधिकारी बावनकर यांच्या नेतृत्वात टॅंकरच्या आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. या टॅंकरमध्ये डिझेल सोबत पेट्रोलही असल्याने आग विझविण्यासाठी चार तासांचा कालावधी लागला. चार तासानंतर टॅंकरचा केवळ सापळा दिसून येत आहे. दरम्यान, या अपघातात तुमसर रहिवासी टॅंकरचालक संतोष देवराव मारबते (वय ३५) व क्‍लीनर विकी सुनील धुर्वे (२२) गंभीर जखमी झाले, तर पेट्रोलपंपवरील कर्मचारी सोनोली येथील रहिवासी वासुदेव भोजराज कापगते (वय २६) यांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती आग अग्निशमन केंद्राचे अधिकारी भोयर यांनी दिली. टॅंकरचालक संतोष मारबते यांचा आगीत चेहरा व हात भाजले असून, विकी धुर्वे यांच्या खांद्याला जबर मार लागला. या दोघांवरही उपचार सुरू आहे.

जामठा मार्गावर जाम 
पेट्रोलचे टॅंकर जळत असल्यामुळे जामठा मार्गावर वाहनांची चांगलीच रांग लागली. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. आग नियंत्रण आल्यानंतर पोलिसांनी एक एक वाहने सोडली. हिंगण्याचे ठाणेदार हेमंत खराबे, पोलिस उपनिरीक्षक मोरेश्‍वर बारापात्रे, शिपाई स्वाती यावले, राजेश घुगे, दिलीप ठाकरे, सचिन श्रीपाद यांनी वाहतूक सुरळीत केली. 

२३ लाखांचे नुकसान 
अपघातग्रस्त टॅंकरमध्ये २० हजार लिटर इंधन होते. यापैकी १० हजार लिटर डिझेल तर १० हजार लिटर पेट्रोल होते. या इंधनाची किंमत १३ लाख रुपये असून १० लाखांच्या टॅंकरसह  एकूण २३ लाखांचे नुकसान झाले. टॅंकर नागपुरातील सुंदर ऑटो सेंटरचे संचालक गोविंद बाशिंदे यांच्या मालकीचे होते.

Web Title: fire by petrol tanker overdue