बस धावली अन्‌ रस्त्यातच थांबली, कय झाले असेल?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

एसटी महामंडळाची बस प्रवाशांना घेऊन निघाली. बस जात असताना अचानक थांबली. प्रवाशांनी गोंधळ घालत बसमधून पळ काढला. वाटेतच थांबून प्रवाशी बसकडे बघत होते. काय झाले असेल... 

घुगूस (जि. चंद्रपूर) : एसटी महामंडळाची लाल परी म्हणून सन्मान मिळालेल्या बसेसची अवस्था फारच वाईट झाली आहे. अशा बसमधून प्रवाशी वाहतूक करून महामंडळ चालक, वाहक व प्रवाशांच्या जीविताशी खेळत आहे. धावती बस अचानक पेटल्यावर हा अनुभव शुक्रवारी अनेक प्रवाशांनी घेतला. अक्षरशः त्यांना जीव वाचविण्यासाठी बसमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे लागले. 

अवश्य वाचा - ही आहे बाहुबली मांजर... जाणून घ्या हिची खासियत

चंद्रपूर आगाराची चंद्रपूर-घुगूस-वणी (चक 40, छ 9429) ही बसफेरी घुगुसवरून शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास वणीसाठी निघाली. दोन कोलोमीटर अंतर पार करताच वाहकाला चालकाच्या आसनाच्या मागे असलेल्या वयरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात आले. धूर निघताना पाहून वाहकाने त्यावर कापड टाकला. मात्र, धूर निघताना बघून प्रवाशी घाबरले. त्यांनी दाराच्या दिशेने धाव घेतली. 

Image may contain: one or more people and people sitting
बसला आग लागल्याने भयभीत झालेले प्रवासी 

चालक व वाहकाने प्रसंगावधान राखून रस्त्यावर बस थांवबली. धूर निघत असलेल्या ठिकाणी पाणी ओतले व आग विझली. तोपर्यंत अर्धे प्रवाशी बसमधून जीव मुठित घेऊन उतरले होते. आग विझेपर्यंत मात्र अर्ध्या प्रवाशांचा जीव टांगणीला होता. बसच्या डाव्या बाजूने महामार्गावरील वाहनांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे वाहकाने प्रवाशांना उतरवताना काळजी घेतली. त्यानंतर काही वेळातच दुसरी बस आली. प्रवाशांनी त्या बसमधून स्थळ गाठले. मात्र, प्रवाशांनी बसची झालेली गलितगात्र अवस्था बघून महामंडळाच्या कामकाजाबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. 

Image may contain: sky and outdoor
खाली उतरून बुसकडे पाहताना प्रवासी 

एसटीचा प्रवास झाला जोखमीचा

एसटी महामंडळाच्या अनेक बसेसची अवस्था फारच वाईट झाली आहे. त्या रस्त्यावर का धावत आहेत? त्यांना परिवहन अधिकारी परवानगी कशी देत आहेत? असे अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. गेल्या सरकारमध्ये परिवहन मंत्री शिवसेनेचे होते. त्यांनी शिवशाही बसेसला जेवढे महत्त्व दिले तेवढे महामंडळाच्या लाल परीला दिले नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढून एसटीचा प्रवास आता सुरक्षित राहिला नसून तो जोखमीचा ठरत आहे. नव्या सरकारने महामंडळाच्या उर्जितवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

सविस्तर वाचा - लज्जास्पद, उपराजधानी दुसऱ्या क्रमांकावर; काय असावे कारण?

मुलीची हनुवटी फुटली

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी-लाठी मार्गावरील दुचाकी, चारचाकीचा प्रवास नादुरुस्त रस्त्यांमुळे सुरक्षित राहिलेला नाही. अशात या मार्गाने धावणाऱ्या एसटीचा प्रवासही आता धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. गुरुवारी भरधाव जाणारी बस एका मोठ्या खड्ड्यातून उसळली आणि बसमधील प्रवाशांचाही तोलही गेला. प्रवाशांमधील एक तरुणी जोरदार उसळल्यामुळे तिची हनुवटी फुटली. तरुणीवर प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा येथे उपचार सुरू आहे. ही घटना गुरुवारी (ता. 26) सोनापूर गावाजवळ घडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire started in bus