महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर गोळीबार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 December 2019

महापौर संदीप जोशी जामठा जवळील रसरंजन धाब्यावर लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. मध्यरात्री ते शहरात परत येत होते. त्याच्यासोबत काही अन्य गाड्याही होत्या. त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळीच्या गाड्या पुढे होत्या. सर्वात शेवटी महापौर संदीप जोशी यांची फॉर्च्युनर गाडी होती.

नागपूर : महापौर संदीप जोशी कुटुंबीयांसोबत जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथून परत येत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर गोळीबार केला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने संदीप जोशी आणि कुटुंबीयांना कोणतीही दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जोशी यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा - #NagpurWinterSession : महाविकास आघाडी पाच वर्षांची "मॅच' जिंकणार : मुख्यमंत्री

महापौर संदीप जोशी जामठा जवळील रसरंजन धाब्यावर लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. मध्यरात्री ते शहरात परत येत होते. त्याच्यासोबत काही अन्य गाड्याही होत्या. त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळीच्या गाड्या पुढे होत्या. सर्वात शेवटी महापौर संदीप जोशी यांची फॉर्च्युनर गाडी होती. दरम्यान, दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी महापौरांच्या गाडीवर देशी कट्यातून बेछुट गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर चार गोळ्या झाडल्या. 

Image may contain: car and outdoor

महापौर संदीप जोशी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेसंदर्भात संदीप जोशी यांनी पोलिस आयुक्‍त भूषणकुमार उपाध्याय यांना माहिती दिली. तसेच बेलतरोडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यावेळी संदीप जोशी यांचे मित्रमंडळीही घटनास्थही उपस्थित होते. 

काही दिवसांपूर्वी मिळाली होती धमकी

महापौर संदीप जोशी यांनी शहरातील वाहतुकीची कोंडी सोडिविण्यासाठी शहरातील प्रमुख मार्ग व बाजार भागातील अतिक्रमण काढण्याचा मनोदय व्यक्‍त केला होता. तसेच नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेण्यासाठी शहरात विविध ठिकाणी शंभर तक्रार बॉक्‍स लावले होते. यामुळे त्यांना धमकीचे पत्र आले होते. यात त्यांना व कुटुंबीयांनी ठार मारण्याची धमकी दिली होती, हे विशेष. 

Image may contain: car and outdoor

शहरात तगडा पोलिस बंदोबस्त

सोमवारपासून शहरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यामुळे शहरात पोलिसांचा तकडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणात पोलिसांची संख्या असताना महापौरांवर हल्ला होणे म्हणजे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. संदीप जोशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद अविवेशनात उमटतात का, असा प्रश्‍न आता निर्मा झाला आहे. 

क्लिक करा - #NagpurWinterSession : सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला : फडणवीस

निंदनीय घटना

शहरातील महापौर संदीप जोशी यांच्यावर हल्ला होणे ही निंदनीय घटना आहे. महापौरच सुरक्षित नसतील तर अन्य नागरिकांचे काय होणार, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: firing on Mayor Sandeep Joshi vehicle