यवतमाळातील 'बुकी’च्या घरावर छापा ; 'बिग बॅश लीग 'टी-ट्वेंटी’वर सट्टा, सायबर सेलची कारवाई

For the first time, a bookie's house in Yavatmal has been raided.jpg
For the first time, a bookie's house in Yavatmal has been raided.jpg

यवतमाळ : सध्या ऑस्ट्रेलियात ’बिग बॅश लीग टी-ट्वेंटी’ या अत्यंत लोकप्रिय असलेल्या क्रिकेटचे सामने सुरू आहेत. या सामन्यांवर यवतमाळातील 'बुकीं’कडून सट्टा स्वीकारणे सुरू होते. सायबर सेलने याप्रकरणी कारवाई करून चार संशयितांना ताब्यात घेऊन सहा लाख 57 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या उत्कृष्ट कारवाईकरिता पथकाला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी मंगळवारी (ता. 29) पत्रकार परिषदेत दिली.

सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पुरी, सहायक पोलिस निरीक्षक शुभांगी आगासे यांच्या नेतृत्वात प्रथमच यवतमाळातील बुकीच्या घरावर छापा टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी (ता. 28) स्थानिक आठवडी बाजारातील नितीन उर्फ राम चिमणलाल शर्मा (वय 32) यांच्या घरी छापा टाकला. त्याठिकाणी नीलेश अर्जुन नान्ने (वय 25), दुर्गेशसिंग मोतीसिंग राणा (वय 24) दोघेही (रा.आठवडी बाजार) व विक्रम विजय गहरवाल (वय 32, रा. साई मंदिर जवळ) यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. ते चौघेही एलईडी टीव्हीवर बिग बॅश लीग ’टी-ट्वेंटी’चा अ‍ॅडेलाइट विरुद्ध पार्थ हा सामना सुरू असताना हॉट लाइन व मोबाईल फोनद्वारे क्रिकेट सट्ट्यांवर आकडे घेताना, लॅपटॉप व कागदावर क्रिकेट सट्ट्याची नोंद करताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून क्रिकेट बेटिंग, सट्टा खेळण्यासाठी लागणारे साहित्य, एक हॉट-लाइन व 16 मोबाईल कनेक्शन असलेली (पोपट लाइन डब्बा), एक लॅपटॉप, प्रिंटर, एलईडी टीव्ही, 25 मोबाईल, एक दुचाकी व इतर साहित्य, रोख रक्कम 3 लाख 18 हजार 860 रुपये असा एकूण 6 लाख 57 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात कलम 4, 5 व महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास अपर पोलिस अधीक्षक डॉ. के.ए.धरणे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. के.ए.धरणे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अमोल पुरी, सहायक पोलिस निरीक्षक शुभांगी आगासे, पोहवा गजानन डोंगरे, पोना उल्हास कुरकुटे, कविश पाळेकर, पोकॉ किशोर झेंडेकर, पंकज गिरी, अजय निंबोळकर, सतीश सोनोने व मपोहवा सीमा बोबडे, प्रमिला डेरे, पोना सुनीता देवगडकर, मिलती तरोणे, निशा शेंडे यांनी केली आहे.

यवतमाळ शहर हे आयपीएल सट्ट्याचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून उदयास आले आहे. पोलिस बुकींच्या घरापर्यंत प्रथमच पोहोचले आहेत. मोठ्या बुकींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आता या कारवाईमुळे प्रशस्त झाला आहे. सटोडियांची पाळेमुळे खणून यवतमाळ शहराची ही ओळख पुसून काढण्याचे काम पोलिस निश्‍चितपणे करणार आहेत.
-डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा पोलिस अधीक्षक, यवतमाळ.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com