स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली गणेशपिपरी अडेवागावातून बस

संदीप रायपुरे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

गावात पहिल्यांदाच एसटी आल्याने मार्गावरील गावागावात स्वागत करित गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. स्वातंत्र्य मिळून सात दशक लोटलीत पण अनेक गावांनी अद्यापही गावात बस पाहिली नाही. गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी पासून समोरील अनेक गावांची हिच स्थिती.
 

गोंडपिपरी जि. चंद्रपूर - देशाला स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर गावात एसटी आली. अन् शेतकरी, कामगार, भाजीपाला विक्रेते, शाळकरी विद्यार्थी, महिला अन् गावकऱ्यांनी जंगी स्वागत करित आनंदोत्सव साजरा केला. गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी ते अडेगावपर्यंत आज एसटी धावली. गावात पहिल्यांदाच एसटी आल्याने मार्गावरील गावागावात स्वागत करित गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. स्वातंत्र्य मिळून सात दशक लोटलीत पण अनेक गावांनी अद्यापही गावात बस पाहिली नाही. गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी पासून समोरील अनेक गावांची हिच स्थिती.

मागास व दुर्गम तालुका अशी गोंडपिपरी तालुक्याची ओळख. तालुक्यातील अनेक गावे अद्यापही मुख्य प्रवाहात नाहीत. अनेक गावात एसटीची बस धावत नाही. गोंडपिपरी, गणेशपिपरी, चेकपिपरी पासून तर आडेगावपर्यतच्या नागरिकांचा थेट गोंडपिपरीशी संबंध येतो. दळणवळणाची मोजकीच साधन. अशात या गावातून बस सुरू व्हावी, ही मागणी अनेकदा समोर आली. पण प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत गेला. परिसरातील गावातील शेकडो विद्यार्थी गोंडपिपरीत शिक्षण घेतात. पण पायदळ चालून शाळेत जाण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर नव्हता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या गावाची ही गत कायम होती. शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, कामगार, भाजीपाला विक्रेते व महिलांना देखील याचा मोठाच त्रास होता.

याच मार्गावरील गणेशपिपरी हा पंचायत समितीचे उपसभापती मनीष वासमवार यांचा गाव. गावातील व परिसरातील जनतेला होणारा त्रास त्यांनी जवळून बघितला. दररोज पायदळ शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बघून ते व्यथीत झाले. अन् या मार्गावरून एसटी सुरू करण्यासाठी ते सरसावले. त्यांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांना यश मिळाले. आज सकाळीच गावात एसटी दाखल झाली. अन् गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आलेल्या एसटी ची विधीवत पुजा करण्यात आली. मनीष वासमवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जि. प. सदस्य स्वाती वडपल्लीवार, सरपंच किरण वासमवार, आगार नियंत्रक बंडू मोरे, सतीश वासमवार, जेष्ठ कार्यकर्ते जनार्धन तेलसे, डॉ. किशोर वडपल्लीवार, यांच्यासह गावकऱ्यांची यावेळी उपस्थीती होती. बसचालक आर शेख, गंगाधर लाड, गणेश मोहुर्ले, मधूकर गेडाम, यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सदर बस गोंडपिपरीवरून गणेशपिपरी, चेकपिपरी, धामणगाव व अडेगावपर्यंत ही बस धावणार आहे. दिवसातून चारदा ही बस ये जा करील.
 

गेल्या वर्षभरापासून सातत्याने बसेससाठी पाठपुरावा केला.आमदार संजय धोटे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे याःनी सहकार्य केले.यामुळे या मार्गावरून पहिल्यांदाच बस धावली.परिसरात नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळाला. - मनीष वासमवार (उपसभापती, पंचायत समिती गोंडपिपरी)

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: For the first time since independence bus ran at Ganeshpipri Adewagaon