‘आधी शौचालय, नंतर घराचे बघू’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

भिवसेनखोरीतील झोपडपट्टीतील नागरिकांनी रचला इतिहास

भिवसेनखोरीतील झोपडपट्टीतील नागरिकांनी रचला इतिहास

‘आरोग्य चांगले राहील, तर घरही उत्तम राहीलच. त्यामुळे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घरी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. माझ्यानंतर चिंतामणीनगरातील माझ्या शेजाऱ्यांनाही वाट मोकळी झाली अन्‌ आज सर्वांकडे शौचालय आहे’, असे अभिमानाने सांगणाऱ्या गौतम खोब्रागडे यांच्या चेहऱ्यावर एक युद्ध जिंकल्याचे भाव होते. भिवसेनखोरी परिसरातील चिंतामणीनगर झोपडपट्टीतील बरेच नागरिक उघड्यावर शौचासाठी जात होते. याच झोपडपट्टीतील गौतम खोब्रागडे वाडीतील बजाज टी गोडाउनमध्ये तर त्यांची पत्नी प्रभा सेंटर पॉइंट शाळा दाभा येथे काम करतात. टिनाचे शेड असलेल्या झोपडीवजा घरात ते राहतात. जेमतेम आर्थिक स्थिती असलेल्या खोब्रागडे दाम्पत्यासाठी घरी शौचालये बांधणे अवघडच होते. या दोघांनाही दोन मुले आहेत. 

घरी शौचालय नसल्याने ९ वर्षीय अनुष्का या मुलीला चांदा येथे आजीकडे पाठविले होते, असे प्रभा खोब्रागडे यांनी सांगितले. एक दिवस प्रभागातील नगरसेवकाने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत महापालिका शौचालय बांधण्यास अनुदान देत असल्याचे सांगितले. नगरसेवकाने दिलेल्या या योजनेच्या माहितीवरून खोब्रागडे यांनी शौचालयासाठी अर्ज केला. शौचालयासाठी अनुदान मिळाले, परंतु सोबतच बाथरूमही बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 

थोडेफार वाचविलेले पैसे खर्च करून शौचालय व बाथरूमही त्यांनी बांधले. या योजनेचा लाभ घेणारे खोब्रागडे पहिलेच, त्यामुळे ते या वस्तीतील नागरिकांसाठी प्रेरक ठरले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या सात-आठ शेजाऱ्यांनीही उत्कृष्ट शौचालये तयार केली. त्यामुळे आता उघड्यावर शौचास जाणे बंद झालेच, शिवाय आरोग्याच्या समस्याही नाहीशा झाल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. या परिसरातून शौचालयासाठी दोनशे अर्ज आले असून प्रत्येकानेच शौचालयासोबत बाथरूमही बांधून घेतल्याचे सेंटर फॉर सस्टेनेबल नागपूरच्या लीना बुद्धे यांनी सांगितले. 
नागरिकांसोबत समन्वय आणि पायाभूत सुविधांसाठी प्रबळ इच्छाशक्तीमुळे येथील नागरिकांचे जीवन आता सुसह्य झाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Web Title: first toilet after home