फवारणीचा पहिला बळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नेर (जि. यवतमाळ)  : तालुक्‍यातील घारेफळ येथील नितीन दादाराव कचरे (वय 32) या तरुण शेतकऱ्याचा कपाशीवर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 10) सकाळदरम्यान घडली. या घटनेने शासन व जिल्हा प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

नेर (जि. यवतमाळ)  : तालुक्‍यातील घारेफळ येथील नितीन दादाराव कचरे (वय 32) या तरुण शेतकऱ्याचा कपाशीवर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 10) सकाळदरम्यान घडली. या घटनेने शासन व जिल्हा प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांवर पिकांवर फवारणी करताना विषबाधा झाल्याने मृत्यू ओढवला होता; तर, हजारांवर शेतकऱ्यांना बाधा झाली होती. या घटनांना दैनिक "सकाळ'ने प्रसिद्ध दिल्याने त्याचे पडसाद लोकसभा व विधानसभेतही उमटले होते. राज्य शासनाने या विषयाची गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गेल्या वर्षी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून जनजागृती करून विविध उपाययोजना केल्या होत्या. परिणामी, एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नाही. यंदा, मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच जनजागृतीअभावी जिल्ह्यात मृत्यूची फवारणी सुरू झाली. एका तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. मृताच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन कचरे शनिवारी सकाळी साडेसातला रमेश कचरे यांच्या शेतात कपाशीवर फवारणीसाठी रोजमजुरीने गेले होते. फवारणी करीत असताना त्यांना चक्कर आली व उलट्या झाल्या. त्यामुळे ते घरी परत आले. त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असताना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या नावाने सात एकर शेतजमीन आहे. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी व चार वर्षांची मुलगी, असा आप्तपरिवार आहे. प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.
 
फवारणी किटचा वापर थांबला
तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शेतकऱ्यांना फवारणी किट उपलब्ध करून दिल्या होत्या. गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला. मात्र, यंदा शेतकरी फवारणी किटचा वापर करताना दिसत नाही. याबाबत कृषी विभागाने जनजागृती करण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first victim of spraying