...आणि पतीच्या लग्नात धडकली पत्नी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

आधी लग्न झाले असताना दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणाऱ्या पतीच्या लग्नसमारंभस्थळी पहिली पत्नी अचानक धडकली. त्यामुळे पती कोंडीत सापडला. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की झाल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्याची घटना सोमवारी (ता. 25) शहरात घडली.

अमरावती : आधी लग्न झाले असताना दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणाऱ्या पतीच्या लग्नसमारंभस्थळी पहिली पत्नी अचानक धडकली. त्यामुळे पती कोंडीत सापडला. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की झाल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्याची घटना सोमवारी (ता. 25) शहरात घडली.

येथील अकोली मार्गावर असलेल्या एका मंगल कार्यालयात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित महिलेने या प्रकरणाची तक्रार पोलिसांत केली. तक्रारीनुसार, त्यांचे लग्न आज बोहल्यावर चढलेल्या वराशी झाले होते. परंतु, काही दिवसांपासून त्यांच्यात मतभेद सुरू होते. हा मतभेद घटस्फोटापर्यंत पोहोचला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. असे असतानाही पतीने दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरविले.

सकाळीच लग्नसमारंभ सुरू झाला. पतीचे लग्न असल्याचे कळताच पहिली पत्नी आपल्या नातेवाइकांसह मंगल कार्यालयात धडकली. अचानक पत्नीला बघून पती व त्यांच्या नातेवाइकांचे धाबे दणाणले. समारंभस्थळी धक्काबुक्की झाली. त्याचा फटका वरालासुद्धा बसल्याची माहिती आहे. त्या महिलेने घटनेची तक्रार बडनेरा पोलिस ठाण्यात नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी दुसरे लग्न करणाऱ्या युवकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या गदारोळानंतरही हे लग्न पार पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रकरणी कुणालाही अटक झाली नाही.

Web Title: First wife come to husband s second marriage