पाचशे शिक्षक होणार अतिरिक्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

नागपूर : अकरावीच्या सुमारे पंचवीस हजार जागा रिक्त राहण्याची शक्‍यता असल्याने शहरातील महाविद्यालयांमध्ये जवळपास पाचशे शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीही जवळपास शंभरावर शिक्षक अतिरिक्त ठरले होते.

नागपूर : अकरावीच्या सुमारे पंचवीस हजार जागा रिक्त राहण्याची शक्‍यता असल्याने शहरातील महाविद्यालयांमध्ये जवळपास पाचशे शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीही जवळपास शंभरावर शिक्षक अतिरिक्त ठरले होते.
अकरावीच्या 58 हजार 240 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, त्यासाठी 30 हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. आता अकरावीच्या तिसऱ्या फेरीस उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर विशेष फेरी घेण्यात येईल. मात्र, आतापर्यंत दुसऱ्या फेरीअखेर 20 हजार 829 जागांवर प्रवेश देण्यात आले. साधारणत: 120 विद्यार्थ्यांची एक तुकडी ठरत असते. यानुसार एका तुकडीसाठी तीन शिक्षकांचा समावेश करण्यात येतो. मात्र, कला आणि वाणिज्य किंवा विज्ञान अशा संयुक्त शाखांचे महाविद्यालय असल्यास त्यांना साडेचार शिक्षकांची मान्यता मिळते. मात्र, कला वा वाणिज्य शाखेच्या महाविद्यालयांना तीन-तीन याप्रमाणे शिक्षक मिळतात. यंदा कला शाखेत असलेल्या 9 हजार 416 जागांपैकी 1 हजार 581 प्रवेश नोंदविण्यात आले. याशिवाय वाणिज्य शाखेतील 17 हजार 744 जागांपैकी 5 हजार 144 जागांवर प्रवेश तर विज्ञान शाखेत 27 हजार 60 जागांपैकी 13 हजार 805 प्रवेश देण्यात आले. त्यामुळे जवळपास 37 हजार 411 रिक्त जागांचा समावेश आहे. तिसऱ्या आणि विशेष फेरीनंतर फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले तरी, जवळपास 30 हजारांवर जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे जवळपास 250 तुकड्यांवर संक्रांत येणार असून, त्यामुळे किमान पाचशे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. त्यामुळे भविष्यात या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्‍न भविष्यात गंभीर होण्याची शक्‍यता आहे.
............
प्रवेश गेले ग्रामीणमध्ये
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया शहरापुरती मर्यादित असल्याने ग्रामीण भागात असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश फुल्ल झाले आहेत. याचा फटका शहरी भागातील महाविद्यालयांना बसला. शहरी भागात शिकवणी वर्गांशी टायअप असलेली महाविद्यालये सोडल्यास इतर महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची संख्या बरीच मोठी आहे.
.....
अकरावीतील प्रवेशात यंदाच्या रिक्त जागांची संख्या वाढल्याने निश्‍चितच शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. मात्र, त्यांची निश्‍चित संख्या सांगता येणार नाही.
प्रा. अशोक गव्हाणे, कार्यवाह


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five hundred teachers will be extra