जेवण करून घरी आले आणि बसला धक्का... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी स्वयंपाकगृहाच्या खिडकीचे ग्रील तोडून रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह पाच लाखांची घरफोडी केली.

यवतमाळ : मुलाच्या लग्न समारंभानंतर नातेवकांनी कुटुंबीयांना जेवणासाठी दारव्ह्याला बोलावले. आग्रहाचे निमंत्रण असल्याने सर्वच्या सर्व जण सायंकाळी गेले. रात्री घरी परतल्यावर मात्र त्यांना धक्काच बसला. काय झाले असेल? 

घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी स्वयंपाकगृहाच्या खिडकीचे ग्रील तोडून रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह पाच लाखांची घरफोडी केली. ही घटना रविवारी (ता. 1) रात्री दहाच्या सुमारास येथील सत्यनारायण ले-आउटमध्ये उघडकीस आली.

गणेश शिवराम जाधव सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. नातेवाइकांकडे जेवणासाठी सायंकाळी सातला ते दारव्हा येथे गेले होते. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्‍कम असा पाच लाखांवर मुद्देमाल लंपास केला.

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: रोपटे आणि बाहेरील
यवतमाळ : याच खिडकीची ग्रील तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. 

जाधव कुटुंबीय घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी लगेच शेजाऱ्यांसह अवधूतवाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. डॉग स्कॉट युनिटने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. यवतमाळच्या उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर, "एलसीबी'चे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, ठाणेदार आनंद वागतकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासाचे निर्देश दिले.

याप्रकरणी गणेश जाधव यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. 

नुकताच आटोपला विवाह सोहळा 

सेवानिवृत्त मुख्याध्यापक जाधव यांच्या मुलाचा विवाह सोहळा नोव्हेंबर महिन्यात अकोला येथे पार पडला. स्वागत समारंभ आणि लग्नात नवदाम्पत्याला मोठ्या प्रमाणात भेटवस्तू मिळाल्या. नवविवाहित दाम्पत्याला लग्नात मिळालेले सोन्याचे दागिनेदेखील घरीच होते. चोरट्यांनी त्या दागिन्यांवर हात साफ केला. 

 

हेही वाचा : नागपूर : अवघ्या वीस मिनिटात चोरटे गजाआड 
 

गस्तीवरील पोलिसही त्याच भागात 

सत्यनारायण ले-आउटमध्ये चोरीची घटना घडली. त्याचवेळी अवधूतवाडी पोलिसही त्याच परिसरात गस्तीवर होते. चोरीची घटना उघडकीस येताच पोलिसांत एकच खळबळ उडाली. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाती काहीच लागले नाही. 

चोरट्यांची यादी बाहेर 

यवतमाळ शहरात व जिल्ह्यात चोरीच्या कारवायानंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या चोरट्यांची यादी बाहेर काढण्यात आली आहे. पोलिस हिस्ट्रिशिटर चोरट्यांची झाडाझडती घेत आहेत. अल्पवयीन मुले अथवा परजिल्ह्यांतील चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five lakh burglaries with cash and gold jewelry