या कारणांमुळे होतो मिरगीचा आजार...वाचा  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

विदर्भात दोन लाखांवर रुग्ण 
समाजात जनजागरणाची चळवळ निर्माण व्हावी 
दरवर्षी 24 लाख रुग्णांची भर 
80 टक्के रुग्ण अल्प उत्पन्न असणाऱ्या देशातील

नागपूर : जगात मिरगीचे पाच कोटी रुग्ण आहेत. दरवर्षी 24 लाख रुग्णांची भर पडते. 80 टक्के रुग्ण अल्प उत्पन्न असणाऱ्या देशातील आहेत. भारतात मिरगीचा (फीट्‌स) आजार दर शंभर व्यक्तींमध्ये एकाला आढळतो. दरवर्षी देशात 4 लाख रुग्णांची भर पडते. विदर्भाचा विचार करता 2 कोटी लोकसंख्येत सुमारे 2 लाख मिरगीचे रुग्ण आहेत. विशेष असे की, औषधोपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो. परंतु, अंधश्रद्धेमुळे यात अधिक भर पडत आहे. 

समाजात मिरगीबाबत अनेक गैरसमज आहेत. यामुळे या आजाराबाबत जनजागृतीची गरज आहे. ही बाब लक्षात घेत जगात 17 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मिरगी जागृती दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्याशी संवाद साधला. मिरगीच्या रुग्णाला कांदा हुंगवतात, चप्पल हुंगवतात; मात्र रुग्णास याचा काहीही उपयोग होत नाही. या आजारावर पूर्वीही बरीच औषधे होती आणि आताही आहेत. मिरगीवरील उपचारासाठी मेंदूचा आलेख (ईईजी) काढावा लागतो. एमआरआय काढून याचे निदान करावे लागते. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. सर्वसामान्यपणे बालपणी तसेच 50 वर्षांपुढील व्यक्तींमध्ये त्याचे प्रमाण जास्त असते. मिरगी येणे म्हणजे मेंदूतील लहरींमध्ये बिघाड होणे. मेंदूमध्ये सामान्यवेळी विद्युततरंगाचे वहन होत असते. त्यामुळे शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत चालतात. पण, जेव्हा विद्युततरंग मेंदूच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे प्रमाणापेक्षा जास्त पाठविले जातात, तेव्हा मिरगीचे झटके येत असल्याची माहिती डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली. 

रक्तदाब वाढला तर ब्रेन हॅमरेज होण्याचा धोका असतो. मेंदूज्वरमध्ये बॅक्‍टेरीयल व फंगल इन्फेक्‍शन मेंदूला झालेले असते. तर, रस्त्यावरील अपघातात मेंदूला इजा होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. तसेच एड्‌समुळे प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे मेंदूवर परिणाम होतो. 

ही काळजी घ्यावी 
मद्यपान करू नये. तंबाखू, गुटखा खाऊ नये. 
डुकराचे मांस खाऊ नये. 
मिरगीचा झटका आल्या चप्पल हुंगवू नये. 

 मिरगी हा मेंदूशी संबंधित आजार
मिरगी हा मेंदूशी संबंधित आजार आहे. अनेकदा पती-पत्नीच्या घटस्फोटास मिरगी (अपस्मार) कारणीभूत ठरतो. न्यूरॉलॉजिस्टकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये 50 टक्के रुग्ण डोकेदुखीचे असून, 30 टक्के मिरगीचे असतात. डोकेदुखी जर फार पूर्वीपासूनची असेल तर ती निश्‍चितच गंभीर नसते. मात्र, कधीच डोके दुखत नाही व असह्य डोकेदुखी असेल तर ते निश्‍चितच गंभीर आजाराचे लक्षण असते. मिरगी औषधोपचाराने पूर्णपणे बरा होतो. 
-डॉ. चंद्रशेखर मेश्राम, अध्यक्ष, ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुप ऑफ वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five million epilepsy patients in the world