पाच जहाल माओवादी पोलिसांना शरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी मोठ्या संख्येने शरण येत असून जिल्ह्यातील पाच जहाल माओवाद्यांनी नुकतीच शरणागती पत्करली. यावेळी प्रभारी पोलिस अधीक्षक राजा, अपर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, महेंद्र पंडित उपस्थित होते. या पाचही माओवाद्यांवर एकूण 24 लाखांचे बक्षीस होते.

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी मोठ्या संख्येने शरण येत असून जिल्ह्यातील पाच जहाल माओवाद्यांनी नुकतीच शरणागती पत्करली. यावेळी प्रभारी पोलिस अधीक्षक राजा, अपर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, महेंद्र पंडित उपस्थित होते. या पाचही माओवाद्यांवर एकूण 24 लाखांचे बक्षीस होते.
शरण आलेल्यांमध्ये सैनू उर्फ मिरगू झुरू वेळदा, रूपी उर्फ झुरी कांडे नरोटे, अर्जुन उर्फ नरेश बारसाय पोया, छाया उर्फ राजे देवू कुळयेटी, विनू उर्फ रामनाथ उर्फ बिजावू सुंदर कोवाची यांचा समावेश आहे. यातील सैनू वेळदा एप्रिल 2001 मध्ये कसनसूर एरिया प्लाटून क्रमांक 3 मध्ये भरती झाला होता. मार्च 2008 मध्ये कंपनी क्रमांक 4 चा प्लाटून ए कमांडर म्हणून त्याची पदोन्नती झाली. त्याचा एकूण 63 पोलिस-माओवादी चकमकीत सहभाग होता. यात 11 स्फोट, 17 खून, 4 जाळपोळ व 3 अपहरणाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर 12 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. रुपी नरोटे डिसेंबर 2003 मध्ये कसनसूर दलममध्ये दाखल होऊन 2008 मध्ये ती कंपनी क्रमांक 4 सीची प्लाटून कमांडर होती. तिच्यावर 42 पोलिस -माओवादी चकमकीत सहभाग, 7 स्फोट, 8 खून व 2 जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अर्जुन पोया सप्टेंबर 2011 मध्ये टिपागड दलमचा सदस्य होता. मार्च 2014 पासून प्रेस टिम सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याचा एकूण पाच चकमक, 1 खून व 1 जाळपोळीच्या गुन्ह्यात सहभाग आहे. शासनाने त्याच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. छाया कुळयेटी ऑगस्ट 2011 ला भामरागड दलममध्ये दाखल झाली होती. मार्च 2015 पासून साउथ डिव्हिजन सीएनएम टिममध्ये ती सदस्य होती. तिच्यावर 5 चकमक, 3 खून, 8 जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. विनू कोवाची जून 2011 ला टिपागड एलओएसमध्ये सदस्य म्हणून भरती होऊन डिसेंबर 2016 पासून डिव्हिसी जोगन्ना याचा गार्ड म्हणून काम करीत होता. त्याचा एकूण 6 चकमक, 2 खून व 7 जाळपोळीच्या गुन्ह्यात सहभाग आहे. शासनाने त्याच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. शरणागत माओवाद्यांपैकी सैनू वेळदा व रुपी नरोटे यांचा आणि अर्जुन पोया व छाया कुळयेटी यांचा विवाह झाला आहे.

Web Title: Five naxlites surrenderd

फोटो गॅलरी