राज्यात तीन महिन्यांत पाच वाघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

वाघ वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना वाघांच्या मृत्यूची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. राज्यात गेल्या तीन महिन्यांत पाच वाघांचा मृत्यू झाला. यात नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी दोन वाघ दगावले असून, एक यवतमाळ जिल्ह्यातील आहे.

नागपूर - वाघ वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना वाघांच्या मृत्यूची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. राज्यात गेल्या तीन महिन्यांत पाच वाघांचा मृत्यू झाला. यात नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी दोन वाघ दगावले असून, एक यवतमाळ जिल्ह्यातील आहे. सर्वच वाघ नैसर्गिक कारणामुळे गतप्राण झाले असले, तरी गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. यामुळे वनसंवर्धन आणि संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

‘देशातील वाघांची राजधानी’ असे बिरुद मिरविणाऱ्या महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत असताना होणारे मृत्यू चिंता वाढवणारे आहेत. पेंच व्याघ्रप्रकल्पातील देवलापार वनपरिक्षेत्रात पहिली घटना घडली. दुसऱ्याच दिवशी चिखलदरा मोथा येथे मेळघाट व्याघ्रप्रकल्पात दुसरा वाघ दगावला. आकोट तालुक्‍यातील शहापुरात तिसरा, नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्रात चौथा आणि यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्‍यातील टिपेश्‍वर अभयारण्यात पाचव्या वाघाचा मृत्यू झाला. दगावलेल्या पाचांपैकी तीन वाघीण आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक वाघ असूनही तिथे एकही वाघाचा मृत्यू न होणे हे वन्यप्रेमींना सुखद धक्का देणारी बाब ठरली आहे. 

वाघांच्या अवशेषांना परदेशी बाजारात मोठी किंमत असल्याने स्थानिकांच्या मदतीने बरेचदा वाघांसाठी जाळे पसरवून त्यांची शिकार केली जाते. यासाठी अनेक पर्याय वापरण्यात येत असले, तरी नैसर्गिक पाणवठ्यांवर तृणभक्षक प्राण्यांची शिकार करण्यासाठी पाण्यात कीटकनाशक मिसळून वाघांची शिकार होत असल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यात वनकर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.  

Web Title: Five tigers died in three months