दोन बिबट्यांसह पाच वन्यप्राण्यांची शिकार...चंद्रपूर हादरले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

भद्रावती आयुध निर्माणी चांदा वसाहतीतील डीएससी कॉलनीच्या परिसरात शनिवारी (ता. 1) सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन बिबट, दोन अस्वल आणि एक हरिण मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने या प्राण्यांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी वनविभागाने अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

भद्रावती (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्हा वनव्याप्त आहे. येथील वनक्षेत्रात विविध प्रजातींच्या वन्यजीवांचा वावर मोठा आहे. पाणी आणि शिकारीच्या शोधात वन्यजीव गाववेशीवर येऊन धडकत आहेत. येथील आयुध निर्माणी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सतत अस्वल व बिबट्याचे दर्शन होत होते.

मात्र, शनिवारी दोन अस्वल आणि दोन बिबट आणि एका हरिणाचा मृतदेहच आयुध निर्माणी चांदा वसाहतीतील डीएससी कॉलनीच्या परिसरात हाती लागला.

 

No photo description available.
मृत अस्वल.

जिवंत विद्युत तारा

जिवंत विद्युत तारांच्या धक्‍क्‍याने एकाच वेळी चार वन्यजीवांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बांबूच्या खुट्या आणि दोन बांबू एकमेकाला बांधून 11 केव्हीच्या लाइनजवळ पडून होते. जीआय कंपनीचा नवीन लांब आणि एक जुना तारदेखील घटनास्थळी आढळून आला होता. पाचही जनावर एकाच रांगेत मृतावस्थेत पडून होते. जिवंत वीजतारा रानडुक्कर आणि हरिणाची शिकार करण्यासाठी लावण्यात आल्या होत्या, असा अंदाज आहे.

घटनास्थळापासून आयुध निर्माणाची डीएससी विभाग हाकेच्या अंतरावर आहे. मात्र, याबाबत आयुध निर्माणी प्रशासन अनभिज्ञ असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या वन्यजीवांचा चार दिवसांअगोदरच मृत्युमुखी पडले होते. त्याचे शरीर कुजायला लागले होते.

मृत वन्यप्राण्यांना चिताग्नी

घटनेची माहिती होताच वनविभाग विभागीय वनाधिकारी ए. एल. सोनकुसरे, सहायक वनसंरक्षक एस. एल. लखमावाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एकता शेडमाके, मुख्य वनजीवरक्षक यांचे प्रतिनिधी मुकेश भांददकर, मानव वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, भद्रावतीचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. व्ही. महेशकर यांच्यासह आयुध निर्माणीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृत जनावरांत एक नर बिबट, एक मादी बिबट, पूर्ण वाढ झालेले एक नर अस्वल, एक मादी अस्वलीचा समावेश आहे. मृत जनावरांचे शवविच्छेदन करून त्यांना चिताग्नी देण्यात आला.

वनविभागाचा अंदाज

प्राथमिक अहवाल, निरीक्षणानुसार बिबट, अस्वलीचा मृत्यू विद्युत प्रवाह लागून झाला असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी वनविभागाने गुन्हा नोंदविला असून, पुढील चौकशी करण्यात येत असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी ए. एल. सोनकुसरे यांनी दिली.

एकाचवेळी पाच प्राणी पहिल्यांदाच मृतावस्थेत

जिल्ह्यात आजवर जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने एक, दोन प्राणी मृत्यूमुखी पडले असल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, आयुध निर्माणी परिसरात पहिल्यांदाच एकाचवेळी पाच प्राणी दगावल्याची ही घटना पहिल्यांदाच घडली आहे. वन्यप्रेमींनी याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

कसं काय बुवा? : दारू गाळण्यासाठी अशी लढवली शक्‍कल

दोषींवर कडक कारवाई
भद्रावती येथील आयुध निर्माणी परिसरात दोन बिबट, दोन अस्वल आणि एक हरिण मृतावस्थेत आढळून आले. या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. यासंदर्भात वनमंत्री संजय राठोड यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
- प्रतिभा धानोरकर, आमदार, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five wildlife hunted with two leopords at chandrapur