झेंडा रोविला..! सिरोंचापुत्रांनी गाठले यशाचे "शिखर' 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 January 2020

कधीकाळी ब्रिटिशांचा जिल्हा अशी ओळख असलेला सिरोंचा आज स्वतंत्र भारतात गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे. व्हर्जिनिया तंबाखूच्या लागवडीसह अनेक पर्यटन स्थळे व आदिवासी, तेलुगू संस्कृतीच्या वैशिष्ट्यांनी नटलेल्या या भूमीतील नागरिकही जिद्दी, परिश्रमी आणि यशाच्या शिखरावर आरुढ होत असल्याचे दिसून येत आहे.

सिरोंचा (जि. गडचिरोली) : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्‍यातील तरुणाई गरिबी, प्रतिकूल परिस्थिती आणि संकटांवर मात करीत विविध क्षेत्रांमध्ये स्वतःसोबतच जिल्ह्याचे नावलौकिक केले. सिरोचांतील सुपूत्र असलेला जितेश आरवेल्लीवार हा पोलिस उपनिरीक्षक, वेंकटेश सिद्दाम हा सहायक मोटार वाहन निरीक्षक, तर मडावी याने राष्ट्रीय हॉकी संघात स्थान मिळविले आहे. 

Image may contain: 2 people, people standing
सिरोंचा : सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून निवड झालेला वेंकटेश सिद्दाम. 

कधीकाळी ब्रिटिशांचा जिल्हा

कधीकाळी ब्रिटिशांचा जिल्हा अशी ओळख असलेला सिरोंचा आज स्वतंत्र भारतात गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे. व्हर्जिनिया तंबाखूच्या लागवडीसह अनेक पर्यटन स्थळे व आदिवासी, तेलुगू संस्कृतीच्या वैशिष्ट्यांनी नटलेल्या या भूमीतील नागरिकही जिद्दी, परिश्रमी आणि यशाच्या शिखरावर आरुढ होत असल्याचे दिसून येत आहे. सिरोंचा तालुक्‍यातील अनेक युवक आता पोलिस आणि महसूल विभागात मोठी पदे मिळविण्यासोबतच विविध खेळांमध्येही पदके पटकावत आहेत. 


सिरोंचा : हॉकी राष्ट्रीय संघात निवड झालेला मडावी.

स्वतःसोबत केले जिल्ह्याचे नावलौकिक

सिरोंचा तालुक्‍यातील अतिदुर्गम, अतिसंवेदनशील व नक्षल प्रभावीत भाग असलेल्या पेंटीपाका येथील जितेश आरवेल्लीवार हा आज आपल्या मेहनतीच्या बळावर पोलिस उपनिरीक्षक झाला आहे. तालुका मुख्यालयापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरलासारख्या अतिदुर्गम ग्रामीण भागातील गोपाल गावडे या आदिवासी तरुणाने राष्ट्रीय दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच तालुक्‍यातील रोमपल्लीसारख्या छोट्याशा गावातील मडावी याची राष्ट्रीय हॉकी संघात निवड झाली आहे. छत्तीसगड सीमेवर असलेल्या मुक्कीडगुट्टा गावात एका छोट्याशा गरीब कुटुंबात जन्मलेला तरुण गावडे याने राष्ट्रीय व्हॉलीबाल संघात स्थान पटकावले आहे. अंकिसा येथील वेंकटेश सिद्दाम याची सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. याशिवाय इतरही अनेक युवक, युवती प्रशासकीय सेवा व क्रीडा क्षेत्रात उच्च स्थान पटकावून सिरोंचा तालुक्‍यासह जिल्ह्याचा नावलौकिक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

हेही वाचा- दोघांमध्ये बिनसले आणि केला तिच्यावर गोळीबार 

मुलीही नाहीत मागे... 

सिरोंचा तालुक्‍यातील तरुणच नव्हे, तर तरुणीही अनेक क्षेत्रात आपल्या यशाची पताका उंच फडकावत आहेत. झिंगानूर येथील कराटे प्रशिक्षक हीना शेख ही नुकतीच चेन्नई येथे आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाली आहे. पितृछत्र हरविलेल्या हीनाने आर्थिक संकटासह अनेक समस्यांचा सामना करीत या क्रीडाप्रकारात यश प्राप्त केले आहे. चेन्नईला जाण्यासाठी तिच्याकडे पैसे नसल्याचे बघून सिरोंचातील सुहृदयी नागरिक तिच्या मदतीला धावून आले. त्यामुळे सिरोंचाची ही कन्या सुवर्णपदक जिंकण्याचा अदम्य विश्‍वास घेऊन चेन्नईला रवाना झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flags Raised..! Sirocha`Son achieved "peak" of success