मालखेड तलावावर आढळले फ्लेमिंगो

चांदूररेल्वे ः मालखेड तलावात खाद्य शोधताना फ्लेमिंगो पक्षी.
चांदूररेल्वे ः मालखेड तलावात खाद्य शोधताना फ्लेमिंगो पक्षी.

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : संपूर्ण भारतात आपल्या वेगळ्या आकारमान आणि सौंदर्यामुळे ओळखला जाणारा बगळा जातीतील फ्लेमिंगो या पक्ष्यांचा थवा तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा तालुक्‍यातील मालखेड तलावावर आढळून आला आहे. 2004 मध्ये मोठ्या संख्येत हे पक्षी तलावावर आढळून आले होते. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे.
तालुक्‍यातील सावंगा विठोबा गावाजवळ असलेला मालखेड तलाव हा विविध पक्ष्यांच्या आवडीचे स्थळ आहे. विविध जातींचे पक्षी त्या परिसरात आढळून येतात. अनेक दूरवरचे पर्यटन पक्षिप्रेमीसुद्धा या भागात पक्षिनिरीक्षणासाठी येतात. गेल्या दोन वर्षांपासून पावसाअभावी मालखेड तलाव आटला आहे. त्यामुळे काही वर्षांपासून या भागात पक्ष्यांची वर्दळ कमी होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून या तलावावर तब्बल 58 फ्लेमिंगो आढळून आले. पक्षिमित्र जयंत वडतकर व त्यांच्या चमूने मालखेड तलावावर रविवारी भेट दिली. हे पक्षी काही दिवस आगोदर नागपूर परिसरात होते, असे त्यांनी सांगितले. एक ते दोन दिवस या पक्षांचा मालखेड तलावावर मुक्काम राहू शकतो. त्यानंतर त्यांचा प्रजननाचा काळ सुरू होणार असल्याने ते गुजरातकडे मार्गक्रमण करतील. मुंबई मार्गे गुजरात असा त्यांचा प्रवास राहणार आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये मोठे धरण असतानाही मालखेड तलाव हे या फ्लेमिंगोचे आवडते ठिकाण आहे. सुरक्षित वातावरण आणि मुबलक खाद्य असल्याने पक्षी याच ठिकाणी येत असल्याचे वडतकर यांनी सांगितले. बगळा जातीत उंच आणि लांब डोलदार मानेसाठी हा पक्षी ओळखला जातो. शुभ्र पांढरा आणि लालसर गुलाबी छटा, यामुळे या पक्षाच्या सौंदर्यात वाढ झालेली आहे. या वेळी जयंत वडतकर यांच्यासोबत पक्षिमित्र गजानन वाघ, प्राची वाडकर आदी उपस्थित होते.
फ्लेमिंगोचे मराठीत नाव "अग्निपंख'
सर्वसाधारणपणे हे पक्षी समुद्रकिनाऱ्यावर आढळतात. यांचे मुख्य ठिकाण म्हणजे चिल्का लेक, कच्छचे रण आणि महाराष्ट्रातील मुंबईतील ठाण्याची खाडी या परिसरात लाखोंच्या संख्येने पक्षी आढळून येतात. गुलाबी रंगामुळे यांना अग्निपंख असेही मराठीत संबोधले जाते. चिल्का लेक ते कच्छचे रण यादरम्यान प्रवास करताना त्यांना मालखेड तलाव हे मधात लागत असल्याने त्याठिकाणी काही काळ मुक्काम करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com