अजब सरकार की गजब कहाणी; ऑगस्टमध्ये आला पूर, डिसेंबरमध्ये केली पाहणी, आता मदतीसाठी वाट पाहणी

file photo
file photo

भंडारा : जिल्ह्यातील वैनगंगा व तिच्या उपनद्यांना ऑगस्टमध्ये अभूतपूर्व महापूर आला होता. त्यासाठी निसर्गासह यंत्रणांचा गलथानपणाही तेवढाच जबाबदार होता. त्याबाबत सर्वेक्षणाचे सोपस्कार तेव्हाच पूर्ण झाले होते. मात्र, पाच महिन्यांनंतर गुरुवारी केंद्रीय पथकाने पूरबाधित भागाची पाहणी करून नुकसानाचा आढावा घेतला. त्यामुले अजब सरकारकी गजब कहाणीचा प्रत्यय आला. तेव्हा केंद्राची मदत काय दहा महिन्यांनी मिळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात व जवळच्या भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र, सूचना मिळूनही त्या तुलनेत पूर्वतयारी करण्यास संबंधित विभागांकडून पुरेशी काळजी घेता आली नाही. यामुळे मध्यरात्रीपासून वैनगंगेने धोक्‍याची पातळी ओलांडून नदी काठावरील गावांत धडक दिली.


तत्पूर्वीच गोसेखुर्द धरणाची पातळी कमी केली असती, तर हा महापूर तेवढा भयावह ठरला नसता. याची जाणीव असताना कामात गलथापनपणा करणाऱ्या एक कर्मचारी-अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. भंडारा शहरातील बसस्थानक, तकिया वॉर्ड, मेंढा आदी अनेक वस्त्यांत पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. सर्वच तालुक्‍यांत पुराने थैमान घातले होते.


मदतीची प्रतीक्षा कायम

देशात कोरोना संकट सुरू असताना जिल्हावासींवर हे दुहेरी संकट आले होते. पवनी व लाखांदूर तालुक्‍यातील शेकडो गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. सुदैवाने त्यावेळी कोरोना संकटाचा प्रभाव कमी होता; तरीही पाच जणांचा मृत्यू झाला होता. प्रशासनाकडून शक्‍य तेवढी सर्व मदत करून नागरिकांना खाण्यापिण्याचे साहित्य पुरविण्यात आले. संबंधित सर्व विभागांनी सर्वेक्षण करून नुकसानाचा आढावा घेतला. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पूरबाधितांच्या नुकसानाबाबत शासनाला अहवाल पाठविले आहेत. परंतु, आता पाच महिन्यांनी गुरुवारी केंद्रीय पथकाने अचानक जिल्ह्याला भेट देऊन नुकसानाचा आढावा घेतला. यात फक्त पवनी व भंडारा तालुक्‍यांतच भेट देण्यात आली आहे.


सर्वाधिक नुकसानग्रस्त भाग टाळला

लाखांदूर तालुक्‍यात वैनगंगा व चुलबंद या नद्यांना पूर आल्यामुळे यावर्षी शेकडो लोक प्रभावित झाले आहेत. नदीकाठावरील शेतातील पीक वाहून गेले असून शेतात वाळूचे ढिगारे साचले होते. लहान मुले, महिला, वृद्धांना ऐन पुरातून जीव वाचवत इकडून तिकडे जावे लागले होते. पशुपालकांची जनावरे वाहून गेली. कित्येकांचे घरे कोसळून नुकसान झाले. या सर्वांची भरपाई होणे शक्‍य नाही. परंतु, जखमेवर फुंकर मारायची असेल तर, वेळेवर भेट तरी द्यायला हवी होती, असे मत पूरग्रस्तांकडून व्यक्त केले जात आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com