संततधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

उमरेड (जि.नागपूर) : गेल्या काही दिवसांपूर्वी शांत झालेला मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला. मंगळवारी (ता.13) संपूर्ण दिवस सुरू असलेल्या संततधार पाऊस 31.03 मिमी पडल्याची नोंद तहसील कार्यालयातून मिळाली. पावसामुळे तालुक्‍यातील अनेक छोट्या-मोठ्या नदीनाल्यांना पूर आला. 

उमरेड (जि.नागपूर) : गेल्या काही दिवसांपूर्वी शांत झालेला मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला. मंगळवारी (ता.13) संपूर्ण दिवस सुरू असलेल्या संततधार पाऊस 31.03 मिमी पडल्याची नोंद तहसील कार्यालयातून मिळाली. पावसामुळे तालुक्‍यातील अनेक छोट्या-मोठ्या नदीनाल्यांना पूर आला. 
उमरेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत आंबोली गावात जाण्याच्या मार्गावर असलेल्या नाल्यावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत आंबोली येथे जाण्यासाठी उमरेड- पिराया-आंबोली, असा प्रवास करावा लागतो. यादरम्यान एक नाला येतो. त्या नाल्यावर उतारभागात पूल असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले जाते. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत होते. पलीकडच्या गावातील नागरिकांना अलीकडच्या गावात आणि तेथून पुढे उमरेड शहरात जाणे अशक्‍य होते. विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागते, तर वाहतूक ठप्प होते. आसपासच्या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांमध्येसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचून पिकांची नासाडी होते. हा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.शासनाचे याकडे दुर्लक्षच आहे. तेव्हा शासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष केंद्रित करून ही समस्या सोडवावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. 
कमी उंचीच्या पुलांची समस्या 
उमरेड-कळमना-लोहारा या मार्गावरसुद्धा असाच एक पूल आहे. त्या ठिकाणीसुद्धा पूरस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कळमना गावात जाताना मार्गावर एक नाला पडतो. हा नाला अरुंद व त्यावरील पूल कमी उंचीचा असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे गावांचा संपर्क तुटतो. जनजीवन विस्कळीत होते. वाहतूक खोळंबते आणि उमरेड कळमना हा एकमेव मार्ग असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडते. समोरच पुन्हा लोहारा, खुरसापार, जुनोनी, डोंगरगाव, चिखलधोकडा आदी गावे येतात. या सर्व गावांचासुद्धा संपर्क तुटतो. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून ही पुराची समस्या संबंधित नागरिकांसमोर उद्भवते. परंतु, यावर अजूनही काही उपाययोजना करण्यात आली नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floods flood rivers due to incessant rains